आळ्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या पिंज-यात अडकला

आळेफाटा(प्रतिनिधी)आळे शिवारात धुमाकूळ घालणारा बिबटया गुरुवारी पहाटे कैचान मळ्यातील सागर डावखर यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला.

आळेफाटा परीसरात पिंजऱ्यात अडकलेला दहावा तर यावर्षी पिंजऱ्यात अडकलेला हा अकरावा बिबटया आहे.

आळे(ता.जुन्नर)येथील कैचानमळ्यात सागर डावखर यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात गुरूवारी पहाटे बिबटया अडकल्यानंतर त्याला तातडीने माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आल्याचे वनकर्मचारी संतोष साळुंखे यांनी सांगितले.

आळे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार आणि पाळीव प्राण्यांवर हल्ल्याबरोबर दुचाकीस्वारांनाही सावज बनविण्याचा प्रयत्न झाल्याने,नागरिकांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याची कमालीची दहशत निर्माण झाली होती.

बिबट्याच्या बंदोवस्तासाठी वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य मुकूंद भंडलकर, जयश्री डावखर यांनी वनविभागाकडे केल्यानंतर आठ दिवसांपूर्वी कैचानमळ्यात पिंजरा लावण्यात आला होता.