जुन्नर दि.(प्रतिनिधी):- जुन्नर तालुक्यातील बहुचर्चित आंबेगव्हाण येथील बिबट सफारी उभारण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८० कोटी रुपयांचा, तसेच प्रशासकीय इमारतीकरीता ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याच्या विकास कामासाठी निधीच्या माध्यमातून १२० कोटी रुपयांची भेट दिल्याची माहिती आ.अतुल बेनके यांनी दिली.
आ.बेनके यांनी सांगितले की,आघाडी सरकारच्या काळात बिबट सफारी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी १ कोटी ५० लक्ष रुपये दिले होते. त्यानंतर आंबेगव्हाण येथे बिबट सफारी उभारण्याचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. नंतर बिबट सफारी निधीच्या प्रतीक्षेत होती. उच्चाधिकार समितीने मान्यता दिली असून उपमुख्यमंत्री पवार यांनी जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण बिबट सफारीसाठी ८० कोटी ६४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केल्याने पुढील काळात या कामाला गती येणार आहे.
जुन्नर येथील महसूल, पोलीस स्टेशन व इतर शासकीय कार्यालया साठी पुरेशी जागा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. धान्य गोडावूनच्या जागेत प्रशासकीय इमारत उभारणीसाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यामध्ये अनेक रस्ते,पूल एशियन डेव्हलपमेंट योजनेंतर्गत निधी, नारायणगाव ग्रामीण रुग्णालय, आदिवासी विकास निधीतून आदी कामांना निधी मंजूर होणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.
भविष्यात शिवजन्म भूमी पर्यटन विकासाच्या दृष्टीने विविध स्तरांवर अनेक प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होण्याचे संकेत आमदार अतुल बेनके यांनी दिले.