बेल्हे(प्रतिनिधी)पारनेर तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायतीमार्फत तहसीलदारांना एक निवेदन देत, पेमदरा(ता.जुन्नर)गावात सुरू असलेल्या कथित ‘अनधिकृत कला केंद्रा’च्या कामाला त्वरित स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर केंद्रामुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, या केंद्राच्या स्थापनेमुळे युवकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू शकते, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या मते, पेमदरा हे पुणे व अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले गाव असून, येथे अशा स्वरूपाचे केंद्र सुरू झाल्यास परिसरातील वातावरण बिघडून तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या केंद्रामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.
“सुसंस्कारित व सुरक्षित समाजनिर्मितीसाठी अशा केंद्रांना थारा देणे योग्य नाही. हे काम त्वरित थांबवण्यात यावे, अन्यथा ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
तहसीलदार कार्यालयाकडून या निवेदनाची दखल घेण्यात आली असून, पुढील कार्यवाहीसाठी चौकशी सुरू करण्यात येईल, असे सूत्रांकडून समजते.