अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त कवितांचा अवखळ वर्षाव; उदयोन्मुख कवींचा गौरव
जुन्नर:-अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नक्षत्राचं देणं काव्यमंच, जुन्नर तालुका वतीने ऐतिहासिक शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी ‘महालक्ष्मी लॉन्स’ येथे बहारदार ‘नक्षत्र अभिजात मराठी काव्यमैफल’ उत्साहात पार पडली. प्राचीन नाणेघाटाच्या सानिध्यात मराठी कवितेचा हा सोहळा रंगून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण संदेश देत वृक्षारोपण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बालभारती पाठ्यपुस्तक कवी व उत्तम सदाकाळ संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी भूषविले. तालुका अध्यक्ष अॅड. जयराम तांबे, निसर्गप्रेमी रमेश खरमाळे, पर्यटनप्रेमी यश मस्करे, बाळासाहेब हाडवळे, प्रशांत केदारी, राजेश डोके, राजेश साबळे तसेच यशवंत घोडे, पियुष काळे, ज्ञानेश्वर काजळे, अशोक कुकडे, तुषार डावखर, सौ. अलका खोसे, हिरामण माळवे, शशांक जोगळेकर, मनोजकुमार सरदार, विकास राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात प्रा. सोनवणे म्हणाले, “वाचनाबरोबर चिंतनही आवश्यक आहे. आपल्या बोली भाषेचा वापर लेखनात झाला पाहिजे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणारा नाणेघाट शिलालेख आपला वारसा आहे आणि त्याच परिसरात मराठी कवितेचा हा सोहळा होणं ही अभिमानाची बाब आहे. येणाऱ्या पिढ्यांनी लिहिते होणं गरजेचं आहे. कवितेचा ध्यास घेतल्याशिवाय सुंदर निर्मिती होत नाही.”
कार्यक्रमात कवी वादळकार यांच्या ‘वादळाचं घोगावणं’ या चारोळी संग्रहाचा तसेच कवी अशोक उघडे यांच्या ‘मन प्रेमरंगी रंगले’ या काव्यसंग्रहाचा मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आला.
काव्यमैफलीत बालकवी वेदश्री डोके, नित्यश्री घोडे, रियाज दुधाळ, श्रुती डोके, विराज वाणी, तनुजा डोके यांनी आपली सोज्वळ सादरीकरणे सादर करून वातावरण भारावले. तसेच मान्यवर कवी सौ. सरिता कलढोणे, सौ. जयश्री बाबळे, डॉ. मो. शकील जाफरी, श्रीमती नंदा मंडलिक, सौ. रेशमा पानसरे, नवनाथ सरोदे, रणजीत पवार, प्रताप गुंजाळ आदींनी आपापल्या कविता सादर करून काव्यमंच गाजवला. प्रत्येक सहभाग्यांना सन्मानपत्र, शाल व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर काजळे, पियुष काळे, सचिन फुलपगार, प्रशांत केदारी, सागर सोनवणे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कवी विकास राऊत यांनी तर आभारप्रदर्शन यशवंत घोडे यांनी केले. विश्वगीत ‘पसायदान’ने कार्यक्रमाची सांगता झाली.