आळेफाटा:-येडगाव धरणाच्या कुकडी डाव्या कालव्यात पडून उंब्रज येथील अक्षय यशवंत शिंगोटे(वय २८)आणि प्राजक्ता अक्षय शिंगोटे(वय २५)या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी(दि.३०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.तब्बल ४० तासांच्या शोधानंतर बुधवारी(दि.१)सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास लेंडेस्थळ येथे दोघांचेही मृतदेह आढळून आले.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार,सोमवारी सायंकाळी काही नागरिक काळवाडीच्या दिशेने कालव्याच्या रस्त्याने जात असताना त्यांना कालव्याच्या कडेला एक लहान बालक रडत आपल्या आई-वडिलांना हाका मारताना दिसले.संशय आल्याने नागरिकांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता चप्पल आढळून आली. त्याचवेळी कालव्यात लक्ष दिल्यावर संबंधित दाम्पत्य पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना दिसले.
या घटनेची माहिती तत्काळ आळेफाटा पोलीसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक विश्वास जाधव व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूरपर्यंत शोध घेण्यात आला, मात्र यश आले नाही.पाण्याचा वेग प्रचंड असल्याने शोधकार्याला अडथळे येत होते.
दरम्यान,उंब्रज व काळवाडी येथील ग्रामस्थ,सरपंच हिरामण हांडे,तुषार वामन तसेच पोलीस पाटील राहुल हांडे यांनी पाटबंधारे विभागाकडे कालव्याचे पाणी कमी करण्याची मागणी केली.सुरुवातीला अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविल्याने ग्रामस्थ व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.अखेर ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर बुधवारी सकाळी पाणी बंद करण्यात आले.
यानंतर जुन्नर येथील शिवनेरी रेस्क्यू टीमच्या दहा सदस्यांच्या मदतीने पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. घटनास्थळापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर लेंडेस्थळ येथे दोघांचे मृतदेह सापडले.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक विश्वास जाधव, आळेफाटा पोलीस स्टेशनचे कर्मचारी व पोलीस पाटील राहुल हांडे यांनी पंचनामा केला असून पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.