पेमदऱ्यात अर्धवट रस्ता ठरतोय अपघातांना कारणीभूत; काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

बेल्हे:-कल्याण-माळशेज-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ वरील पेमदरा(ता.जुन्नर)गावच्या हद्दीत सुमारे ४०० मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटी करणाचे काम अर्धवट राहिल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.या ठिकाणी यापूर्वी चार-पाच अपघात घडल्याने अर्धवट रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

कल्याण-माळशेज-अहिल्यानगर मार्गावरील कि.मी. १०१/००० ते १६१/२१२ या रस्त्याची लांबी १ एप्रिल २०१९ पासून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित आहे.पेमदरा गावच्या हद्दीत सुमारे ४०० मीटर रस्त्यापैकी अर्ध्या भागाचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून उर्वरित भागाचे काम अद्याप अपूर्ण आहे.

या अर्धवट कामामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांना रस्त्याची स्थिती स्पष्टपणे लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.विशेषतः या महामार्गा वरून वाहने वेगाने धावत असल्याने अपूर्ण रस्त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर पेमदरा येथील अर्धवट रस्त्याचे काँक्रीटी करणाचे काम तातडीने पूर्ण करून वाहनचालकांची गैरसोय आणि अपघाताचा धोका टाळावा,अशी मागणी  पांडुरंग पवार यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वाबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

‘अर्धवट कामामुळे एखादा मोठा अपघात होण्याची वाट प्रशासन पाहणार का?’असा सवाल वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, महामार्ग प्राधिकरणाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *