आपात्रतेच्या भीतीने नळावणे ग्रामपंचायत आठ सदस्यांचे राजीनामे

नळावणे(प्रतिनिधी) : नळावणे ग्रामपंचायतच्या नऊ पैकी आठ सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे ग्रामसेवक आणि सरपंचाकडे दिल्याने खळबळ उडाली.

दरम्यान सरपंच सौ.अर्चना उबाळे यांनी या आठ सदस्यांचे राजीनामे मंजूर केल्यास नळावणे ग्रामपंचायत च्या आठ जागा रिक्त होऊन त्याठिकाणी नव्याने पोटनिवडणुकीत लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरपंचांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राजीनामे दिले असे सांगितले जात असले तरी मासिक सभेला गैरहजर राहत असल्याने अपात्र ठरून बदनामी होऊ नये म्हणून सदस्यांनी राजीनामे दिले असल्याचे बोलले जात आहे.

जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील आणे पठारावरील नळावणे गावच्या सरपंच सौ.अर्चना उबाळे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामपंचायतच्या नऊ पैकी आठ सदस्यांनी आपले राजीनामे ग्रामसेवक गुलाब जगताप यांच्याकडे सपुर्ण केले आणि ग्रामपंचायत कार्यकारणी बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

सन २०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नऊ ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले होते.सरपंच पद अनुसूचित जातीतील महिलासाठी राखीव असल्याने अर्चना उबाळे यांची सरपंच’पदी वर्णी लागली होती.,

सरपंच सौ.अर्चना उबाळे यांनी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना कोणत्याही कामात सहभागी करून न घेता परस्पर मनमानी कारभार सुरू केला असा आरोप केला जात आहे.मात्र नळावणे गावच्या विकास कामांच्या व सर्वसामान्य नागरिकांना व्यक्तिगत कामामुळे त्या जुन्नर तालुक्यात अल्पवधीत प्रकाश झोतात आल्याने गावातील राजकीय पुढाऱ्यांना डोहीजड झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

ग्रामपंचायतची मासिक सभा बुधवारी सरपंच सौ अर्चना उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असताना ग्रामपंचायत उपसरपंच संजोग शिंदे,सदस्य निकिता अशोक शिंदे,शितल भागा शेंगाळ,कविता संजय साबळे, सुखदेव निवृत्ती नवले,सुरेश खंडू गगे,सुवर्णा जालिंदर शिंदे,पल्लवी नवनाथ गगे या सदस्यांनी ग्रामसेवक गुलाब जगताप यांच्याकडे सरपंच सौ.अर्चना उबाळे यांच्या मनमानीला कंटाळून आपल्या सदस्य पदाचे राजीनामे दिले.ग्रामपंचायत कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी केली.

याबाबत अधिक माहितीसाठी सरपंच अर्चना उबाळे यांच्याशी संपर्क साधला असता आठ सदस्यांनी त्यांचे राजीनामे माझ्याऐवजी ग्रामसेवक गुलाब जगताप यांच्याकडे दिले आहेत.ते माझ्याकडे आल्यास मंजूर करून पुढील कारवाईसाठी पाठवणार असल्याचे सांगितले.

दरम्यान राजीनामा दिलेले आठही नळावणे ग्रामपंचायत सदस्य मासिक बैठकीला सातत्याने गैरहजर राहत असल्याने ते अपात्र होऊन बदनामी होईल.याभीतीने त्यांनी राजीरानामे दिले असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

नळावणे ग्रामसेवक गुलाब विष्णू जगताप यांच्याकडे दिलेले राजीनामे सरपंच सौ.अर्चना गणेश उबाळे यांनी मंजूर केल्यास त्या आठही जागा रिक्त होऊन त्याठिकाणी पोटनिवडणुकीत लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.