आणे(प्रतिनिधी)आणे पठार पाणी प्रश्नांबाबत जलसंपदा विभागाकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याच्या निषेधार्थ लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आणे पठारावरील चार गावांनी घेतला आहे.
आणे येथे रंगदास स्वामी महाराजांच्या सभागृहात आणे पठार पाणी कमिटीच्या झालेल्या बैठकित मतदानावर बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
आणे पठार पाणी समितीचे सदस्य गोरखनाथ शिंदे, भारतीय किसान संघाचे जुन्नर तालुकाध्यक्ष बाळासाहेब दाते,देवस्थानचे माजी अध्यक्ष पोपट दाते,शिंदेवाडीचे माजी सरपंच रोहिदास शिंदे,एम.डी.पाटील शिंदे,इंजि. किरण आहेर,आणेच्या सरपंच प्रियांका दाते,पेमदराच्या सरपंच जयश्री गाडेकर,नळवणेच्या सरपंच अर्चना उबाळे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण शिंदे हे बैठकीत झालेल्या चर्चेत सहभागी झाले होते.
या चर्चेत वर्षभरापूर्वी ग्रामसभांनी मतदानावर टाकलेल्या बहिष्कार ठरावानुसार पाणी समितीची यापुढील दिशा ठरविणे,सर्वप्रथम गावोगावी बहिष्काराचे बॅनर्स,फ्लेक्स लावणे,पत्रके वाटणे,प्रचार दौऱ्याप्रमाणे पठारावर जनजागृती करण्यासाठी ध्वनीक्षेपक फिरविणे,वेळप्रसंगी प्रशासनास जाग आणण्यासाठी धरणे आंदोलन करणे आदी उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे मत नोंदविण्यात आले.
आणे पठार विकास संस्थेचे कार्याध्यक्ष मधुकर दाते यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणे पठार पाणी प्रश्नांबाबत शासकीय यंत्रणेकडून ठोस लेखी आश्वासन मिळेपर्यंत पठारावरील चारही गावच्या ग्रामसभांनी पारित केलेला बहिष्कार ठराव मागे घेतला जाणार नाही असा इशारा दिला.या निर्णयाला उपस्थितांनी एकमुखी पाठिंबा दिला.
इंजि.किरण आहेर यांनी यापुढील काळात सर्व ग्रामस्थांनी राजकीय जोडे व मतभेद बाजूला ठेवून पाणी कमिटीच्या मागणीनुसार बहिष्काराच्या ठरावास एकमुखी पाठिंबा द्यावा असे आवाहन केले.
या बैठकीला पठार विकास संस्थेचे उपाध्यक्ष भास्कर आहेर,बाबु दाते,माजी सरपंच योगेश आहेर,आनंदा बेलकर,संतोष दाते,गुलाब दाते,प्रकाश दाते, बाळशिराम आंद्रे,विष्णू दाते,खंडू बेलकर, संभाजी आहेर,कान्हू हांडे, शंकर आहेर,जालिंदर आहेर,अरूण आहेर आदी उपस्थित होते.
या बैठकीचे सूत्रसंचालन बाबाजी आहेर यांनी केले तर देवस्थानचे माजी अध्यक्ष विनायक आहेर यांनी आभार मानले.