४५ लाखांचा चुना-मिश्रीत मिराज तंबाखू जप्त : आळेफाटा पोलिसांची मोठी कारवाई

आळेफाटा(प्रतिनिधी)महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या चुना मिश्रीत मिराज तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी करणाऱ्या टोळीवर आळेफाटा पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी संयुक्त कारवाई करत ४५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करत एकाला अटक केली आहे. ही कारवाई ३ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आली.

विशेष माहितीवरून, पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांना खात्रीशीर माहिती मिळाली की एम एच १८ बी झेड २३५० या क्रमांकाचा टाटा १९१६ मॉडेल ट्रक नाशिकहून आळेफाटा दिशेने येत असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर तंबाखूचा साठा आहे. त्यानुसार, आळेफाटा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पिंपळवंडी बस स्टँड चौकात सापळा रचून ट्रकला अडवले.

तपासादरम्यान ट्रकमधून २५ लाख २० हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित चुना मिश्रीत मिराज तंबाखू व अंदाजे २० लाख रुपये किंमतीचा ट्रक, असा एकूण ४५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी अल्तमश रहमतुल्ला खान (वय ३८, रा. धुळे) या ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून, उर्वरित दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी या प्रकरणी आळेफाटा पोलीस स्टेशन गु.र.नं. २१८/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५ व अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे विविध कलमे अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, व उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पोलीस निरीक्षक विश्वास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

कारवाईदरम्यान पो.हवा. विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित मालुंजे, संदिप वारे, नविन अरगडे, शैलेश वाघमारे, अक्षय नवले, सचिन कोबल, गणेश जगताप, ओंकार खुणे आणि पोलीस मित्र मंगेश कदम हे अधिकारी व कर्मचारी सक्रिय होते.