बेल्हे(प्रतिनिधी)जुन्नर तालुक्यात एक धक्कादायक वास्तव समोर येत आहे. जिथे गायी केवळ दूध देते म्हणून तिचे संगोपन केले जाते, तिथेच नर वासरांबाबत (गोन्हे) अनास्थेची वृत्ती दिसून येत आहे. दूध न देणारे जर्शी नर वासरे जन्मल्यानंतर काही दिवसांतच विनामोबदला कसायांना दिले जात होते. मात्र आता गोरक्षकांच्या भीतीने ही वासरे थेट जंगलात किंवा रस्त्यांवर बेवारसपणे सोडली जात आहेत.
या निष्पाप वासरांचे जंगलात किंवा रस्त्यावर भटकंती सुरू होते. भटके कुत्रे व वन्य प्राणी त्यांच्यावर हल्ले करत असल्याच्या घटनाही घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच आणे शिंदेवाडी रस्त्यावर दोन जर्शी नर वासरे बेवारस अवस्थेत आढळून आली. ही परिस्थिती केवळ आणे गावापुरती मर्यादित नसून, संपूर्ण जुन्नर तालुक्यात व आजूबाजूच्या परिसरात पाहायला मिळत आहे.
या गंभीर प्रकरणावर बाजरंग दलाचे नारायगाव प्रखंड मंत्री गोरख शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, लहान वासरांना बेवारस सोडणे हे प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० अंतर्गत गंभीर व दंडनीय गुन्हा आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांना याची कल्पनाच नसल्याने जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
या समस्येवर मात करण्यासाठी ग्रामपंचायत, पशुवैद्यकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांनी एकत्र येऊन कारवाई केली पाहिजे, अशी मागणी होत आहे. नर वासरे असतील किंवा दूध न देणाऱ्या जनावरांसाठी सरकारने तसेच स्वयंसेवी संस्थांनी संगोपन केंद्रे सुरू करून आर्थिक मदतीची योजना आखावी, अशी अपेक्षा नागरिक व गोरक्षक व्यक्त करत आहेत.
नर वासरे दूध देत नाहीत म्हणून त्यांना टाकाऊ समजणे ही मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे. त्यांच्या जीवनाचा आदर राखणे ही एक सामाजिक, नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. गोरक्षणाचा खरा अर्थ केवळ आंदोलनात नाही, तर या निरागस जीवांना सन्मानाने जगू देण्यात आहे.