पेमदरा कला केंद्र बंद करणाऱ्या विरोधात रेखा मुसळे न्यायालयात जाणार!

पेमदरा(प्रतिनिधी)कल्याण-नगर महामार्गावरील जुन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील गाजलेले पेमदरा कला केंद्र बंद करण्याच्या कारवाईविरोधात आता रेखा मुसळे यांनी कायदेशीर लढाई छेडण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामसभेत नियमांचे कथित उल्लंघन आणि स्थानिकांच्या सहभागाबाबत गंभीर आरोप करत मुसळे यांनी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी त्यांनी कायदेशीर सल्लामसलतही पूर्ण केली असून,येत्या काही दिवसांत न्यायालयात यासंदर्भात दावा दाखल होण्याची शक्यता आहे.

पेमदरा कला केंद्राच्या उभारणीत कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचा रेखा मुसळे यांचा ठाम दावा आहे.उलट,गेल्या दोन वर्षांच्या काळात अनेकांनी या प्रकल्पात आपापली साधनं,श्रम आणि संसाधनं उधळली असल्याचे त्या सांगतात.एका आनंदाने बेलभंडारा उचलला,तर काहींनी आपल्या ट्रॅक्टर,जेसीबीचा धंदा वाढीव दराने केला,एकाची पाइपलाइन या सुविधा मुसळे यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिल्या.

मद्य,शेंदूर आणि भंडारा… पण आता विरोध का?

काहींनी कामाच्या बदल्यात घशाचा कोरडेपणा दूर करण्यासाठी मद्यही स्वीकारलं,असा सूचक आरोपही मुसळे यांनी केला आहे.अनेकांनी शेंदूर आणि भंडारा घेतला,तसेच अगदी शेतीच्या विहिरींपर्यंत सुविधा मुसळे यांनी उपलब्ध करून दिल्या.आता अचानक हेच लोक ग्रामसभेत विरोधात का उभे राहिले,याबाबत रेखाताईंच्या वकिलांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

“हे केवळ राजकीय हस्तक्षेपाचे फलित”समर्थकांचा आरोप

पेमदरा कला केंद्र बंद करण्यामागे राजकीय सुडबुद्धी असल्याचा आरोप समर्थकांकडून करण्यात येत आहे. “जेव्हा केंद्र प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचत होतं,तेव्हाच काही लोकांच्या डोळ्यात रेषा आली,”असा आरोप स्थानिकांनी केला आहे.