आळेफाटा : मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामातील अॅल्युमिनियमच्या तारा चोरणाऱ्या अट्टल टोळीला आळेफाटा पोलिसांनी गजाआड केले आहे. तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दि. २७ ऑगस्ट रोजी बोरी बु (ता. जुन्नर) येथे सोनाई आनंद आश्रम परिसरात ठेवलेले पाच बंडल AAAC Conductor DOG 100 तारे (किंमत साडेपाच लाख) चोरट्यांनी लंपास केले होते. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शोध पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. त्यानंतर आरोपी सौरभ ओंकार तांगडे (रा. नारायणगाव) व विशाल कैलास सुर्यवंशी (रा. सुलतानपुर) यांना अटक केली. चौकशीत त्यांनी विकास देवराम कुऱ्हाडे व सिद्धेश छब्बु साळुंखे (दोघे रा. सुलतानपुर) यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली.
या टोळीने गुन्ह्यात वापरलेली अल्टो कार (एमएच ४६ एन ६१८६, किंमत २ लाख) व टाटा कंपनीचा छोटा हत्ती (एमएच १२ ईक्यू ७२१७, किंमत ५ लाख) जप्त करण्यात आले. तसेच चोरीस गेलेले अॅल्युमिनियम तारे परत मिळवले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पो.हवा. विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, संदिप माळवदे, पो.कॉ. नविन अरगडे, ओंकार खुणे, गणेश जगताप, सखाराम जुंबड व प्रशांत तांगडकर यांनी सहभाग नोंदवला.
आळेफाटा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे सौर कृषी योजनेतील साहित्य चोरी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.