पुणे : नक्षत्राचं देणं काव्यमंच, भोसरीच्या वतीने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त 26 वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य मैफल व पुरस्कार वितरण सोहळा चिंचवड येथील सायन्स पार्क नाट्यगृहात पार पडला. उद्योजक नितीनशेठ लोणारी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
ज्येष्ठ कवी रामचंद्र पंडित अध्यक्षस्थानी होते. ‘कुसुमाग्रज स्मृती गौरव पुरस्कार’ डॉ. राजेंद्र झुंजारराव (पुणे) व कवी उत्तम सदाकाळ (जुन्नर) यांना मिळाला. ‘कविरत्न पुरस्कार’ कवी सुनील बिराजदार (सोलापूर), नवनाथ पोकळे (बीड), बालाजी थोरात (पिंपरी), भाऊसाहेब आढाव (चिंचवड) यांना प्रदान झाला.
यावेळी ‘नक्षत्र राज ज्योतिष रत्न पुरस्कार’ सुभाष चव्हाण, ‘नक्षत्र काव्य दौलत पुरस्कार’ मोहन काळे, तसेच समाजभूषण व उद्योजक गौरव पुरस्कारांनी अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
श्रावणी काव्यलेखन स्पर्धेत दीप्ती कुलकर्णी (हैदराबाद) प्रथम, वैशाली शिरसागर (कोल्हापूर) द्वितीय व अजित राऊळ (सिंधुदुर्ग) तृतीय क्रमांकावर आले. प्रा. राजेंद्र सोनवणे यांची पुस्तके व काव्यमंचचे यूट्यूब चॅनेल यावेळी प्रकाशित झाले.
सलग सात तास रंगलेल्या कविमैफलीत श्रावणी व निसर्ग कवितांचा मनमुराद आस्वाद रसिकांना मिळाला.