आणे : देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाला प्रेरणा देणारे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंतीनिमित्त आणे गावात भव्य सोहळा पार पडला.ग्रामस्थांच्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीने संपूर्ण गाव दणाणून गेले.
मिरवणुकीनंतर ग्रामपंचायत परिसरात उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान वंदना देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी उमाजी नाईक यांच्या शौर्यगाथेचा आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध दिलेल्या लढ्याचा उल्लेख करून त्यांच्या कार्यातून आजच्या पिढीने प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.
कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचे अन्नदाते म्हणून नचिकेत पाटील यांचे विशेष योगदान राहिले. या सोहळ्यात आणे गावातील बहुजन समाजातील नागरिकांसह महिला आणि तरुण वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
गावातील विविध सामाजिक संस्थांनी जयंतीनिमित्त एकतेचा संदेश देत उमाजी नाईक यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. या जल्लोषमय वातावरणात संपूर्ण आणे गाव क्रांतीवीरांच्या जयघोषांनी दुमदुमले होते. याप्रसंगी बाळासाहेब शिरतर,उत्तम वायदंडे,संदीप शितोळे नवनाथ शिरतर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते