मुख्याध्यापकांविरोधात कारवाईच्या मागणीसाठी उपसरपंचांचे आमरण उपोषण सुरू

आळे:-आळे(ता.जुन्नर)येथील ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी करत ग्रामपंचायत आळेचे उपसरपंच निलेश सुरेश शिंदे यांनी आज(दि. १५ सप्टेंबर)पासून संस्था प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

मुख्याध्यापक संदीप सुखदेव भवारी यांच्या कारभाराबाबत गंभीर तक्रारी असून, त्या वारंवार संस्थेकडे तसेच शासनाकडे केल्या तरीही कारवाई न झाल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे अखेर संतप्त होऊन त्यांनी उपोषणाची भूमिका घेतली.

शिंदे यांनी आरोप केला आहे की, मुख्याध्यापक वर्गात अध्यापन करत नाहीत, वेळापत्रकात खोटे तास दाखवले जातात, विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने विविध शुल्क वसूल केले जातात. त्या रकमांचा मनमानी वापर केला जात असल्याचीही गंभीर आर्थिक अनियमितता समोर आली आहे. याशिवाय पालक वर्गाशी उर्मट वर्तन, शाळेत वेळेत गैरहजेरी, तसेच माहिती अधिकारात चुकीची उत्तरे देणे असे प्रकारही होत असल्याचे त्यांनी सांगितले.

“शासन स्तरावरून चौकशी होईपर्यंत माझे उपोषण सुरूच राहील,” असा इशारा शिंदे यांनी दिला आहे. उपोषणामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, ग्रामस्थ व पालक वर्गाकडूनही या घडामोडींना मोठा प्रतिसाद मिळत आहे.