बेल्हे:-जुन्नर तालुक्यातील गुळुंचवाडी गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६१(मुंबई–विशाखापट्टणम) वरचा पूल मृत्यूचा सापळा ठरत असून, यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी थेट भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना मागणीपत्र सादर केले आहे.
अपघातानंतर निर्माण झाला संताप
१९ जुलै रोजी दशक्रिया विधी आटोपून घरी परतणाऱ्या ग्रामस्थांना एका मालवाहू ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर काहीजण गंभीर जखमी झाले. घटनेनंतर लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी पाहणी केली; पण अद्याप ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे.
पुल व रस्ता अरुंद असल्याने धोका
गुळुंचवाडी शिवारातील ओढ्यावरचा पूल खूपच अरुंद आहे. पुलाच्या पूर्वेकडे गावाची स्मशानभूमी असून पश्चिमेकडे मळगंगा मातेचे मंदिर आहे. वाहतुकीचा ताण वाढल्याने येथे नेहमीच अपघाताचा धोका असतो.
पवार यांची मागणी
माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी गडकरींना पाठवलेल्या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की –
पुल पश्चिमेकडून किमान ४ मीटर रुंद करण्यात यावा.
आणे घाट ते गुळुंचवाडी या मार्गावर दोन्ही बाजूंनी ३ मीटर रस्ता वाढविण्यात यावा.
पवार यांनी नमूद केले आहे की, ही सुधारणा झाली तर दळणवळण सुकर होईल, ग्रामस्थांचा जीव धोक्यात राहणार नाही आणि भविष्यातील अपघात टाळता येतील.
ग्रामस्थांची अपेक्षा
गावकऱ्यांचा ठाम विश्वास आहे की, पांडुरंग पवार यांनी केलेल्या या मागणीला केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद द्यावा. “गुळुंचवाडीकरांना सुरक्षित प्रवासाचा हक्क आहे. पूल व रस्ता रुंद करून गावकऱ्यांचा जीव वाचवा,” अशी अपेक्षा ग्रामस्थांनी दिव्य मराठीमार्फत व्यक्त केली आहे.