‘चिकित्सक वृत्तीच अखंड भारत घडवेल’सतीश भिडे यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आवाहन

गिरगाव :“अखंड भारत निर्मितीसाठी प्रत्येक विद्यार्थी तन, मन आणि आचरणाने चिकित्सक असणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन स्वा. वीर सावरकर चरित्र गायक सतीश भिडे यांनी केले. गिरगावातील शिरोळकर हायस्कूल येथे ‘गीत वीर विनायक’ या त्यांच्या ३२५५ व्या संगीत कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास, वक्तृत्व, कर्तृत्व आणि समर्पण या गुणांचे महत्त्व पटवून दिले. “जीवनातील प्रत्येक क्षण जाज्वल्य गुणांनी परिपूर्ण असेल, तर अशीच चिकित्सक वृत्ती देशाला अखंड ठेवू शकते,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांना दररोज एक नवीन इंग्रजी शब्द त्याचे स्पेलिंग, उच्चार आणि अर्थासह शिकण्याचा सल्ला देत त्यांनी प्रेरणा दिली. “तुमच्यातूनच भविष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, ए.पी.जे. अब्दुल कलाम, लालबहादूर शास्त्री आणि विनायक दामोदर सावरकर यांसारखे महान व्यक्तिमत्त्व निर्माण होऊ शकतात,” असे सांगताच शाळेचा परिसर भावुक झाला.
कार्यक्रमात ढोलकी-तबल्यावर कुमार अर्जुन पाटील आणि सर्वेश भोसले यांनी प्रभावी साथ दिली. प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन श्रीमती रसिकाताई नार्वेकर व सीमा शिलेदार यांनी केले. मुख्याध्यापिका संचिताताई गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायली कानडे, गणपतराव कचरे, विश्वासराव भाटकर यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन केले.
या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांनी एकसुरात साथ देत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा उल्लेख करत जातीयता आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी भिडे यांनी केलेल्या आवाहनामुळे उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्ग भावुक झाला.