अहिल्यानगर जिल्ह्याला‘गुटखा सप्लाय हब’ बनवतंय पुणे जिल्ह्यातील बेल्हे गाव!

बेल्हे : राज्यात गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांवर कडक बंदी असतानाही अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा अवैध व्यापार सुरू असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. या अवैध पुरवठ्याचे मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्ह्यातील बेल्हे गावाचे नाव पुढे येत असून,येथून मोठ्या प्रमाणावर गुटखा विविध मार्गांनी अहिल्यानगरमध्ये पोहोचवला जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

बेल्ह्यातील यादववाडी व इंदिरानगर परिसरात मोठे साठे ठेवून किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा केला जात असल्याचे उघड झाले आहे.रात्रीच्या वेळी गुप्तपणे वाहतूक करून हा माल वितरित केला जात असल्याने संपूर्ण साखळी संघटित पद्धतीने कार्यरत असल्याचे दिसून येते.

राज्य शासनाने अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुटखा,पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन,साठवण,विक्री व वितरण यांवर बंदी घातली आहे. तसेच सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण अधिनियम २००३ नुसारही अशा पदार्थांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या कायद्यांचे सर्रास उल्लंघन होत असताना संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गुटखा सेवनामुळे तोंडाचा कर्करोग, हिरड्यांचे आजार, दातांचे नुकसान, पचनसंस्थेचे विकार यांसारखे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो.विशेषतः तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर या व्यसनाच्या आहारी जात असल्याने सामाजिक आरोग्यावर त्याचे दूरगामी परिणाम होत आहेत. आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात असतानाही, अशा अवैध पुरवठ्यामुळे बंदीचा उद्देश फोल ठरत असल्याचे चित्र आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, इतक्या मोठ्या प्रमाणावर गुटख्याची वाहतूक व साठेबाजी होत असताना पोलीस व अन्न व औषध प्रशासनाला याची माहिती नसणे शक्य नाही. तरीही ठोस व सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याने संशय अधिक गडद होत आहे. त्यामुळे बेल्हे येथील मुख्य पुरवठादार, वाहतूक साखळी व स्थानिक साठेबाज यांच्यावर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, तसेच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गुटखा बंदी केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग व अन्न व औषध प्रशासन यांनी समन्वयाने विशेष मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा, अहिल्यानगर जिल्हा गुटखा तस्करीचे मोठे केंद्र बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे.