अडीच वर्षांच्या खतीजाचा पहिलाच उपवास; जुन्नरमध्ये कौतुकाचा वर्षाव

जुन्नर : रमजान महिन्याच्या पवित्र वातावरणात अडीच वर्षांच्या चिमुकलीने केलेल्या पहिल्या उपवासामुळे सध्या जुन्नर परिसरात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. जुन्नर येथील हाजी सकुर इसमाईल इनामदार यांची नात खतीजा महमद खालिद सालीख पठाण (वय अडीच वर्षे) हिने ३ मार्च रोजी, रमजान १४४७ च्या १३ व्या दिवशी आपला पहिलाच उपवास पूर्ण केला.

एवढ्या लहान वयात उपवास पाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे कुटुंबीयांसह नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी खतीजाचे भरभरून कौतुक केले.रमजान महिन्यात मुस्लिम बांधव पहाटेच्या सहरपासून सूर्यास्तानंतरच्या इफ्तारपर्यंत उपवास पाळून अल्लाहची उपासना करतात. या काळात लहान मुलांमध्येही धार्मिक संस्कार रुजावेत, यासाठी अनेक कुटुंबांत मुलांना उपवासाची ओळख करून दिली जाते.

खतीजालाही घरातील वातावरण पाहून उपवास करण्याची इच्छा झाली.कुटुंबीयांनी तिचा उत्साह पाहून तिला प्रोत्साहन दिले. दिवसभर तिने आनंदाने आणि खेळत खेळत हा उपवास पूर्ण केला.संध्याकाळी इफ्तारच्या वेळी कुटुंबीयांच्या उपस्थितीत तिचा पहिला उपवास सोडण्यात आला.
अडीच वर्षांच्या या चिमुकलीने उपवास पूर्ण केल्याची बातमी परिसरात पसरताच अनेकांनी तिचे कौतुक केले.एवढ्या लहान वयात धार्मिक परंपरा आणि श्रद्धेची जाणीव दिसून येत असल्याने नागरिकांनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

खतीजाच्या या पहिल्या उपवासामुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून, तिच्या या कृतीमुळे जुन्नर परिसरात सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेशही पोहोचत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.