जुन्नर:पुणे ग्रामीण जिल्ह्यात अवैध गांजा लागवड व विक्रीवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, जुन्नर तालुक्यातील इंगळून येथे शेतात गांजाची झाडे लावणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ८० गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईची मोहीम हाती घेतली होती. त्याच दरम्यान पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांना गोपनीय माहिती मिळाली की इंगळून परिसरातील एका शेतात अवैधरित्या गांजाची लागवड करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व जुन्नर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत संबंधित शेतात छापा टाकला.
छाप्यामध्ये गहू व बाजरीच्या पिकांमध्ये गांजाची झाडे लपवून लावलेली आढळून आली. चौकशीदरम्यान हे शेत दिनकर विठ्ठल डामसे (वय ६०, रा. इंगळून) यांचे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गांजाची लागवड केल्याची कबुली दिली.
पंचांसमक्ष पंचनामा करून सुमारे ८० गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी पोलीस अंमलदार अजित गेंगजे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास जुन्नर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर, पोलीस निरीक्षक किरण अवचर,सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, अरविंद गाटकुळ, पोलीस कर्मचारी रघुनाथ शिंदे, ऋषिकेश तिटमे, दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, राजू मोमिन,सागर हिले, सागर शिंदे, गणेश शिंदे, अजित गेंगजे, संतोष पठारे या पथकाने पार पाडली.