वडगांवआनंद:-आदर्श जि.प. प्राथमिक शाळा, वडगाव आनंद येथे वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कला महोत्सव “कलादर्पण २०२६” मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला.
विविध संस्कृतींचे दर्शन घडवणारे रंगतदार कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांच्या बहुआयामी कलागुणांमुळे यंदाचा सोहळा विशेष अविस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते डी.बी.वाळुंज यांनी प्रास्ताविक केले, तर छाया डुंबरे यांनी सूत्रसंचालनाची धुरा समर्थपणे सांभाळली.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य मंगेश अण्णा काकडे, माजी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, सरपंच रेलिका जाधव, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तानाजी देवकर तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.
“कलादर्पण २०२६” अंतर्गत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य,नाटक व एकांकिकांनी उपस्थितांची मने जिंकली. गरबा,लावणी,आदिवासी नृत्य,रेट्रो,वारी,“ऑपरेशन सिंदूर” आणि “छावा” यांसारख्या विविध थीमवर आधारित सादरीकरणांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. गणेश वंदनेने सुरू झालेला हा सोहळा शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरला.
कार्यक्रमात जवळपास २० बक्षिसांचा समावेश असलेल्या लकी ड्रॉ उपक्रमास विशेषतः महिला वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळाला.तसेच आभाळे कुटुंबीयांच्या सहकार्याने सादर करण्यात आलेल्या“इलेक्ट्रिक कुंपण”या बिबट्यापासून संरक्षणावर आधारित नाटिकेद्वारे प्रभावी जनजागृती करण्यात आली.
या निमित्ताने विद्यार्थी व पालकांसाठी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाहीर गणेश वाघमारे यांनी मोफत साउंड सिस्टम उपलब्ध करून दिली, तर आदिका लाइट्स यांनी अत्यल्प दरात लाईट, स्क्रीन व डीजे गाडीची व्यवस्था केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय चौगुले पाटील, शिक्षणप्रेमी डी.बी. वाळुंज, मुख्याध्यापक सुनील ठिकेकर, तसेच शिक्षक सुनंदा तांबे, गीतांजली वाळुंज आणि सविता खेत्री यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास जि.प. सदस्य मंगेश अण्णा काकडे, पंचायत समिती सदस्य सपना शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, सरपंच रेलिका जाधव, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तानाजी देवकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष पादिर, गोरक्ष देवकर, वैशाली देवकर, निशा वाळुंज, अल्पना देवकर, कल्पना पाटील, संदीप गडगे, ऋषिकेश कडगे, सोसायटीचे चेअरमन सचिन वाळुंज, सदस्य सुरेश देवकर, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाळुंज, निवृत्त शिक्षक तुकाराम वाळुंज, माजी सरपंच सुमनताई वाळुंज, माजी सरपंच अॅड. वैशालीताई देवकर, अॅड. रवींद्र देवकर आदींचा उपस्थितीत समावेश होता.