दत्तनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

बेल्हे : नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी दत्तनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मान्यवर, पालक आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत शालेय साहित्य व खाऊ वाटपाचा उपक्रम राबविला.


यावेळी पंचायत समिती सदस्य राजेंद्र पिंगट यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. उद्योजक विजय घोडके यांनी विद्यार्थ्यांना खाऊ देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. तसेच मताजी बांगर यांनी दप्तर व विविध शैक्षणिक साहित्य भेट देत विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.याशिवाय अनेक दानशूर व्यक्तींनी वह्या, पुस्तके, पेन तसेच अन्य आवश्यक साहित्य देऊन शिक्षणासाठी आपले योगदान दिले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापकांनी उपस्थितांचे स्वागत करून शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.


या प्रसंगी गावातील मान्यवर, ग्रामपंचायत पदाधिकारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवागत विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजातील विविध घटक एकत्र येऊन केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, नव्या शैक्षणिक वर्षाची सकारात्मक आणि प्रेरणादायी सुरुवात दत्तनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाली.यावेळी पंचायत समिती सदस्य राजेंद्र पिंगट उपसरपंच नवनाथ शिरतर,बबन पिंगट,दादाभाऊ मुलमुले,समीर गायकवाड,सोपान पिंगट आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *