बेल्हे : जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील बेल्हे येथील इंदिरानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध मान्यवर आणि दानशूर व्यक्तींनी शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी पंचायत समिती सदस्य राजेंद्र पिंगट यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. उद्योजक विजय घोडके यांनी खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. तसेच माताजी मताजी बांगर यांनी दप्तर व शालेय साहित्य देत शिक्षणासाठी हातभार लावला. याशिवाय अनेक दानशूर व्यक्तींनी वह्या, पुस्तके, पेन आणि अन्य शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना भेट देऊन नव्या शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात करून दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अमित कुठे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील विविध घटकांनी पुढे येणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य राजेंद्र पिंगट,बेल्हे गावचे उपसरपंच नवनाथ शिरतर,ग्रामपंचायत सदस्य समीर गायकवाड, नाजीम व्यापारी,प्रदीप पिंगट,विजय घोडके,दादाभाऊ मुलमुले,अल्पेश सोनवणे,दिपाली मटाले, सोपान पिंगट, बबन पिंगट आदी मान्यवर उपस्थित होते.नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.शिक्षणासाठी समाजाच्या सहकार्याचा आदर्श संदेश या उपक्रमातून देण्यात आला.