अमेरिकेतील ‘नाफा’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुण्याचा डंका; अथश्री ठुबे यांना ‘बेस्ट एडिटर’ पुरस्कार


पुणे : ‘नॉर्थ अमेरिकन असोसिएशन्स’चा ‘नाफा’ फिल्म फेस्टिव्हल नुकताच ८ ऑगस्ट २०२६ रोजी अमेरिकेत उत्साहात पार पडला. ‘देऊळ’ चित्रपटाचे निर्माते अभिजित घोलप यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या फेस्टिव्हलचे यंदा तिसरे वर्ष होते.
यावर्षी शॉर्ट फिल्म कॅटेगरीमध्ये अथर्व खारकर फिल्म्सच्या प्रफुल्ल खारकर दिग्दर्शित ‘बटरस्कॉच’ या चित्रपटाने दमदार कामगिरी करत बेस्ट शॉर्ट फिल्म (अमेरिका), बेस्ट डायरेक्टर, बेस्ट सिनेमॅटोग्राफर आणि बेस्ट एडिटर असे चार पुरस्कार पटकावले.
‘बटरस्कॉच’चे संकलन पुण्यातील तरुण संकलक अथश्री ठुबे यांनी केले आहे. त्यांना फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट एडिटर’ पुरस्कार सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अथश्री ठुबे गेल्या १० ते १२ वर्षांपासून संकलन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या कामात ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटासह नेटफ्लिक्सच्या ओरिजिनल ‘ब्लू कोबाल्ट’ या चित्रपटासाठी ऑनलाइन एडिटर म्हणून केलेल्या कामाचा समावेश आहे. त्यांनी अनेक डॉक्युमेंटरी, कॉर्पोरेट फिल्म्स आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जाहिरातींचे संकलन केले आहे.
‘अभिमानास्पद महाराष्ट्र’, ‘मीट द वर्ल्ड विथ एसकेएफ’ यांसारख्या डॉक्युमेंटरींसह आयसीआयसीआय बँक, लाईफ रिपब्लिक, इंदिरा युनिव्हर्सिटी आणि चितळे डेअरी यांसारख्या विविध संस्थांच्या जाहिरातींचे एडिटिंगही त्यांनी केले आहे.
व्हिज्युअल प्रमोशनमध्येही अथश्री यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून ‘तेंडल्या’ या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनचे काम विशेष गाजले. तसेच त्यांनी एडिट केलेल्या ‘सुतक’ आणि ‘लास्ट विश’ या शॉर्ट फिल्म्सनी विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
कलाक्षेत्रात जनरेशन झीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अथश्री ठुबे यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांच्या पुढील कामाला नवी दिशा आणि हुरूप मिळाला आहे. मराठी चित्रपट क्षेत्रात मोठे काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *