सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिरतार यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव

पारनेर : पारनेर तालुक्यातील सावरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जय मल्हार क्रांती संघटनेचे मुख्य संघटक सरचिटणीस बाळासाहेब शिरतार यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते शिरतार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बाळासाहेब शिरतार हे गेल्या वीस वर्षांपासून पारनेर तालुक्यात बलुतेदार समाजाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांसाठी काम केले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत यापूर्वीही विविध संस्थांच्या वतीने त्यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नुकताच लोककलावंत सांस्कृतिक विचार मंचच्या वतीने शिर्डी येथे त्यांना ‘साई जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून शिरतार राज्यस्तरावर कार्यरत असून आदिवासी समाजासह विविध सामाजिक प्रश्नांवर ते सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले.

यावेळी बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर, उपसभापती संदीप सालके, माजी सभापती बाबासाहेब तरटे, शिवाजी बेलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते मोहनराव रोकडे, सुनील माकरे, शिवाजी जेडगुले, नवनाथ गांजे, भास्कर बोरुडे, सचिन टकले, अश्विनीताई बोरुडे, धोंडीभाऊ शिरतार, ईश्वर भोसले आदी उपस्थित होते.

गेल्या वीस वर्षांपासून आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी काम करण्याची संधी मिळत आहे. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणे, हीच माझी सामाजिक बांधिलकी आहे. बाजार समितीच्या वतीने मिळालेला हा समाजभूषण पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असून, भविष्यातही अधिक जोमाने सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा यातून मिळाली आहे.

बाळासाहेब शिरतार (सामाजिक कार्यकर्ते)