लोकनियुक्त सरपंच अतुल भांबेरे यांच्या संकल्पनेतून वाकण बंधाऱ्यावर गणेश विसर्जन घाट पूर्ण

बेल्हे : गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांची होणारी गर्दी, पाण्यात उतरताना होणारे अपघात तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी गुळुंचवाडी येथे प्रथमच गणेश विसर्जन घाटाची उभारणी करण्यात आली आहे.लोकनियुक्त सरपंच अतुल भाऊसाहेब भांबेरे यांच्या संकल्पनेतून वाकण बंधारा येथे हा विसर्जन घाट पूर्ण करण्यात आला आहे.

गणेशोत्सव हा गावातील नागरिकांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा सण आहे.मात्र, गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी नागरिकांना सुरक्षित जागेअभावी पाण्यात उतरावे लागत असल्याने दुर्घटनेची शक्यता निर्माण होते.ही बाब लक्षात घेऊन गुळुंचवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाकण बंधारा येथे सुरक्षित आणि सोयीस्कर गणेश विसर्जन घाट तयार करण्याची संकल्पना पुढे आली.त्यानुसार घाटाचे काम पूर्ण करण्यात आले.

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात अशा प्रकारचा विसर्जन घाट प्रथमच तयार करण्यात आल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षितपणे गणेशमूर्तीचे विसर्जन करता यावे, तसेच लहान मुले,महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना कोणताही धोका निर्माण होऊ नये, हा घाट उभारण्यामागील प्रमुख उद्देश आहे.

गुळुंचवाडी गावात अलीकडील काळात विविध विकासकामे आणि नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यावर भर दिला जात आहे.गावाच्या गरजा ओळखून त्या अनुषंगाने विकासकामे करण्याचा प्रयत्न होत असल्याने गुळुंचवाडी गावाकडे परिसरात वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.नागरिकांच्या दैनंदिन गरजा, धार्मिक कार्यक्रम तसेच सार्वजनिक सोयी-सुविधांचा विचार करून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

गणेश विसर्जन घाटाची उभारणी ही केवळ एक विकासकाम नसून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारी संकल्पना असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.गणेशोत्सव काळात या घाटाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार असून, भविष्यातही गावातील विविध सार्वजनिक उपक्रमांसाठी या ठिकाणाचा उपयोग होऊ शकतो.

लोकनियुक्त सरपंच अतुल भाऊसाहेब भांबेरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे गणेशभक्तांना सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन करता येणार आहे. गावाच्या विकासाबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करणाऱ्या अशा उपक्रमांमुळे गुळुंचवाडीच्या विकासकामांना एक वेगळी ओळख निर्माण होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.