बेल्हे : तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सध्या गावोगावी वाद-विवाद होत असताना, गुंजाळवाडी (ता. जुन्नर) येथील ग्रामस्थांनी मात्र कोणताही वाद न घालता एकमताने युवा नेतृत्वाला संधी देत आदर्श निर्माण केला आहे.जुन्या चेहऱ्यांना यंदा संधी न देता तरुण पिढीच्या हातात तंटामुक्ती समितीचे नेतृत्व देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सिद्धेश देवराम बोरचटे यांची निवड करण्यात आली.तर भाऊसाहेब बबन गुंजाळ यांची उपाध्यक्षपदी आणि कु. शुभम पोपट गुंजाळ यांची सचिवपदी निवड करण्यात आली.
तंटामुक्ती समिती ही गावातील वाद-विवाद सामोपचाराने मिटवून गावात शांतता आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.अशा समितीच्या निवडीवरून अनेक ठिकाणी मतभेद आणि वाद निर्माण होत असताना, गुंजाळवाडीतील ग्रामस्थांनी मात्र सामंजस्याची भूमिका घेत युवा नेतृत्वावर विश्वास दाखवला, ही निश्चितच भूषणावह बाब मानली जात आहे.
युवा नेतृत्वाला संधी देण्याच्या या निर्णयामुळे समितीच्या कामाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, गुंजाळवाडी ग्रामस्थांनी इतर गावांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले.