विघ्नहर साखर कारखान्याला राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय क्रमांक

आळेफाटा:श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास हंगाम २०२५-२६ साठी उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा देशातील तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि.,नवी दिल्ली यांच्यावतीने मंगळवारी (दि.२२) नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, सहकार राज्यमंत्री  कृष्णा पाल गुर्जर, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील तसेच महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्री विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले, संचालक मंडळाचे सदस्य तसेच अधिकारी वर्गाने हा पुरस्कार स्वीकारला.यावेळी साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले की,कै.वसंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्व.निवृत्तीशेठ शेरकर यांनी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली.संस्थापक स्व.निवृत्तीशेठ शेरकर व स्व.सोपानशेठ शेरकर यांनी जोपासलेले शेतकरी हित,पारदर्शक कारभार आणि सहकाराच्या मूल्यांवर कारखान्याची वाटचाल सुरू आहे.यापूर्वीही कारखान्यास अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले असून, या राष्ट्रीय पुरस्कारामुळे विघ्नहरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कारखान्याचे विस्तारीकरण कमी कालावधीत पूर्ण करून आधुनिक यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे. त्यामुळे साखर उत्पादनासाठी लागणाऱ्या वाफेचा वापर कमी होऊन बगॅसची बचत होणार असून, त्याचा फायदा आसवनी प्रकल्पाला होणार आहे. तसेच योग्य साखर उतारा मिळण्यास मदत होणार आहे. गाळप क्षमतेत वाढ झाल्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस वेळेत तोडला जाण्यास मदत होणार असल्याचे शेरकर यांनी सांगितले.

विघ्नहर कारखान्यामार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. कारखान्याच्या स्वखर्चातून व्हीएसआय, मांजरी बु. येथे आयोजित ‘ज्ञानयाग’ व ‘ज्ञानलक्ष्मी’ प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी दरवर्षी पुरुष व महिला शेतकऱ्यांना पाठविण्यात येते. तसेच एकरी १०० मेट्रिक टन व त्यापुढील ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते.

एकरी ऊस उत्पादनात वाढ व्हावी यासाठी कारखाना व व्हीएसआय, मांजरी बु. यांच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील गावोगावी शेतकरी मेळावे आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातात. या उपक्रमांमुळे कार्यक्षेत्रातील एकरी ऊस उत्पादन वाढण्यास मदत होत असून, त्याचा सकारात्मक परिणाम कारखान्याच्या साखर उताऱ्यावरही होत असल्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितले.

उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेसाठी मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे कारखान्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा,कार्यक्षम व्यवस्थापनाचा आणि शेतकरीहिताच्या धोरणांचा गौरव असल्याची भावना कारखाना प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.