दिल्लीच्या तख्तावर नारायणगावच्या लावणीची मोहोर!

महाराष्ट्र सदनात लावणीसम्राज्ञी सीमा पोटे यांच्या कलाप्रवासाला मानाचे स्थान; नारायणगावच्या फडाची थेट राजधानीत दखल

नारायणगाव:-शिवजन्मभूमीच्या मातीत घुंगरांचा नाद घुमला… फडावर लावणीचा ठेका रंगला… रसिकांच्या टाळ्यांनी कलाकारांचा उत्साह वाढला… आणि याच कलेचा प्रवास आता थेट देशाच्या राजधानीतील महाराष्ट्र सदनापर्यंत पोहोचला आहे.

लावणीसम्राज्ञी सीमा पोटे-नारायणगावकर यांच्या लावणी सादरीकरणातील छायाचित्राला नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मानाचे स्थान मिळाले आहे.त्यामुळे नारायणगाव च्या लावणी-तमाशाच्या परंपरेची मोहोर राजधानीच्या दालनात उमटली आहे.

महाराष्ट्राच्या लोककलेला केवळ मनोरंजनाची कला न मानता तिच्यामागची परंपरा,संस्कृती आणि ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब जपणाऱ्या कलाकारांमध्ये सीमा पोटे यांचे नाव घेतले जाते.लावणीच्या ठेक्यासोबत अदाकारी, भावमुद्रा, नेत्रकटाक्ष आणि पारंपरिक सादरीकरणाची शैली यामुळे त्यांनी रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले.

आज त्यांच्या कलेचे छायाचित्र महाराष्ट्र सदनाच्या भिंतीवर दिमाखात झळकत आहे.त्यामुळे हा केवळ एका कलाकाराच्या छायाचित्राचा सन्मान नसून नारायणगाव च्या फडापासून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीपर्यंत पोहोचलेल्या लावणी परंपरेची राजधानीत झालेली नोंद म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

फडावरच्या घुंगरांचा नाद पोहोचला दिल्लीच्या दालनात!

नारायणगाव परिसराला लावणी आणि तमाशाची मोठी परंपरा लाभली आहे.गावच्या मातीत,फडावर आणि रंगमंचावर वर्षानुवर्षे या कलेने रसिकांचे मनोरंजन केले. अनेक कलाकारांनी या परंपरेला आपल्या कलेने समृद्ध केले.त्याच परंपरेतील सीमा पोटे यांच्या कलाप्रवासाला आता दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात दृश्यमान सन्मान मिळाला आहे.महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लोककला राजधानीपर्यंत पोहोचल्याने नारायणगाव परिसरातील रसिक आणि लोककलाप्रेमींमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

चौकट:-एका फोटोफ्रेममध्ये मोठा कलाप्रवास!

महाराष्ट्र सदनातील सीमा पोटे यांची फोटोफ्रेम पाहताना त्यामागचा प्रवास सहज लक्षात येतो.रंगमंचावर लावणी सादर करताना घुंगरांचा ठेका,प्रेक्षकांची दाद,फडावरील वातावरण आणि लोककलेशी असलेली नाळ…या सगळ्याचा प्रवास आता एका फोटोफ्रेममधून राजधानीत पोहोचला आहे.गावच्या फडावर सुरू झालेला हा कलाप्रवास दिल्लीच्या दालनात पोहोचणे, हीच या सन्मानाची खरी खासियत आहे.

चौकट:-“हा माझ्या एकटीचा नव्हे, तमाम लावणी कलावंतांचा सन्मान!”

महाराष्ट्र सदनात आपले छायाचित्र लावण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर सीमा पोटे यांनी हा सन्मान केवळ स्वतःचा नसून तमाम लावणी कलाकार आणि रसिकांचा असल्याची भावना व्यक्त केली.“लावणी माझ्यासाठी केवळ कला नाही, तर माझे जीवन आणि महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेली संस्कृती आहे. गावागावच्या फडावर आणि रंगमंचावर लावणी सादर करताना रसिकांनी दिलेले प्रेम हीच माझी खरी ताकद आहे. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात माझे छायाचित्र लावले जाणे हा माझ्या एकटीचा सन्मान नसून महाराष्ट्रातील तमाम लावणी कलावंतांचा आणि या लोककलेवर प्रेम करणाऱ्या रसिकांचा सन्मान आहे. माझ्या कलेच्या प्रवासात ज्यांनी साथ दिली, त्यांचेही हे यश आहे,” असे सीमा पोटे-नारायणगावकर यांनी सांगितले.

चौकट:-“शिवजन्मभूमीसाठी भूषणावह क्षण”

सीमाताई पोटे यांना दिल्लीच्या तख्तावर मिळालेले हे स्थान शिवजन्मभूमीसाठी भूषणावह असल्याचे मत बारा बलुतेदार संघटनेचे पारनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिरतार यांनी व्यक्त केले. ग्रामीण महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली लावणीची कला राजधानीपर्यंत पोहोचणे आणि त्या कलेच्या प्रतिनिधीला महाराष्ट्र सदनात स्थान मिळणे, ही नारायणगावसह संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.