बेल्हे : गुंजाळवाडी परिसरात चोरीच्या घटनांची भीती असतानाच राहुल दावला गुंजाळ यांच्या घरालगतच्या शेडमध्ये दोन अज्ञात चोरटे घुसल्याची घटना समोर आली.सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्यानंतर राहुल गुंजाळ यांनी प्रसंगावधान राखत धाडसाने एका चोरट्याचा पाठलाग करून त्याला पकडले. मात्र, दुसरा चोर अंधाराचा फायदा घेत पसार झाला.
चोरटे शेडमध्ये घुसल्याचे लक्षात येताच राहुल गुंजाळ यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला.यावेळी त्यांनी एका चोरट्याला ताब्यात घेतले.दरम्यान,त्यांनी तातडीने रामा गुंजाळ यांच्याशी संपर्क साधला.त्यानंतर रामा गुंजाळ आणि भाऊसाहेब बबन गुंजाळ घटनास्थळी दाखल झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.त्यानंतर ताब्यात घेतलेल्या चोरट्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.दुसरा संशयित मात्र घटनास्थळा वरून पसार झाला असून,त्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
दरम्यान,राहुल गुंजाळ यांनी दाखवलेल्या धाडसाचे परिसरातून कौतुक होत आहे.मात्र,या घटनेमुळे गुंजाळवाडी परिसरात चोरट्यांची दहशत पुन्हा चर्चेत आली आहे.
गुंजाळवाडी परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी घर, गोठे,शेड तसेच वाहनांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे. अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास स्वतःहून धोका न पत्करता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
गुंजाळवाडीच्या सरपंच नयना रामा गुंजाळ यांनीही नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन केले आहे. परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यास नागरिकांनी एकमेकांना तत्काळ माहिती देऊन पोलिसांशी संपर्क साधावा,असे त्यांनी सांगितले.