पिंपळवंडीत घरफोडी ५ लाख ३८ हजाराचा ऐवज लंपास 

आळेफाटा : अज्ञात चोरट्याने पिंपळवंडी(ता.जुन्नर)येथे घराचे कुलूप तोडून कपाटातील दोन लाख रुपये रोख व दागिने असा ५ लाख ३८ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी (दि ३) रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की पिंपळवंडी-उंब्रज रस्त्यालगत वसंत तुकाराम वाघ यांचे घर आहे वसंत वाघ काही कामानिमित्ताने बाहेरगावी होते त्यांची पत्नी शैला व मुलगा निखिल हे कांदे झाकण्यासाठी घराला कुलुप लावून घराच्या बाजूच्या असलेल्या शेतात गेले होते.याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचे कुलुप काढून घरामध्ये प्रवेश केला व कपाटामधील १ लाख ८० हजार रुपये किमतीचे चार तोळे सोन्याचे मंगळसूत्र ९० हजार रुपये किमतीचे २ तोळे सोन्याच्या अंगठ्या व गळ्यातील पाने ९० हजार रुपये किमतीचे दोन तोळे सोन्याचे ब्रेसलेट ९ हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅम कानातील सोन्याचे डूले बाळी, चांदीच्या पट्टा व कमरपट्टा तसेच रोंख रक्कम १ लाख ६९ हजार असा एकूण ५ लाख ३८ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.त्यानंतर साधारणता अर्धा ते पाऊणतासने निखिल वाघ व शैला वाघ हे दोघेजण घरी आले.त्यांना घराच्या दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले व घरातील कपाटामधील दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याचे दिसून आले.त्यानंतर काही वेळाने कुकडी कालव्याजवळ असलेल्या संतोष फुलसुंदर यांच्या शेतात दागिन्यांची रिकामी पाकिटे आढळून आली.त्यानंतर संतोष यांनी याबाबत निखिल वाघ यांना माहिती दिली त्यानंतर निखिल व वसंत वाघ यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली.या घटनेचा पुढील तपास आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक अनिल पवार करत आहे.