जुन्नर(प्रतिनिधी)दोन वर्षांपूर्वी एकविरा आईच्या जत्रेतून पळवून आणलेल्या चिमुकलीची शिरोली बुद्रुक(ता.जुन्नर) गावातील दक्ष नागरिकांमुळे सुटका झाली.दोन वर्षांनंतर चिमुकली आईवडीलांच्या कुशीत गेली.
शिरोली बुद्रुक(ता.जुन्नर)येथे,वास्तव्यास असलेल्या मेंढपाळाने एका दहावर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून आणून मेंढरं राखण्याच्या कामावर ठेवल्याचे उघडकीस आले.
भारतीय वायुसेनेतून सेवानिवृत्त झालेल्या ज्ञानदेव थोरवे यांच्या घराकडे पाणी नेण्यासाठी मेंढपाळांसोबत आलेल्या चिमुकलीची आस्थेने विचारपूस करताच ती रडू लागली. तिला पळवून आणल्याचे तिने सांगितल्यानंतर थोरवे यांनी गावचे पोलिस पाटील अमोल थोरवे यांना बोलावून माहिती दिली.मी मेंढपाळ संतोष याची मुलगी नसून,त्याने मला एकवीरा देवीच्या जत्रेतून खाऊ आणि नविन कपड्यांचे आमिष दाखवून मला पळवून आणले असल्याचे पोलिस पाटलांना सांगून माझे आईवडील चाकण येथे वास्तव्यास असून,ते भंगार गोळा करण्याचे काम करतात.
या मुलीचे कुटुंब लोणावळा येथील वळवण पुलाखाली राहात असताना अपहरण झाले होते.तेथून ते एकवीरा देवीच्या यात्रेसाठी गेले होते.मात्र,दारू पिल्याने तिच्या आईवडिलांची शुद्ध हरपल्यामुळे काही स्थानिक नागरिकांच्या सांगण्यावरून आरोपीने तिला तेथून आणले.
जुन्नरच्या प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी भाग्यश्री धिरबस्सी यांनी पोलिस तपास यंत्रणा कामाला लावली. मुलीशी स्वतः संवाद साधून तिला विश्वासात घेऊन माहिती प्राप्त केली.सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरे,पोलिस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे,हृषिकेश तिटमे, सागर शिंदे,विनोद पवार यांच्या पथकाने सखोल चौकशी केली.
त्यात या मुलीच्या पालकांनी तिचे अपहरण झाल्याची तक्रार लोणावळा ग्रामीणच्या कार्ले पोलिस ठाण्यात १४ जून २०२३ रोजी दाखल केली असल्याचे समजले. त्यानंतर जुन्नर पोलिसांनी चोवीस तासांच्या आत कारवाई करून ही अल्पवयीन मुलगी व तिचे अपहरण करणाऱ्या संतोष बिरा करगळ या आरोपीला ताब्यात घेऊन कार्ले पोलिसांकडे सुपूर्त केले.