पारनेर(श्रीकांत चौरे):
पारनेर तहसील येथे शेकडो वयोवृद्ध नागरीक आले होते. त्या वयोवृद्धांना संपर्क केला असता त्यांनी चालू असलेल्या सरकारी योजनेच्या पेंशन संदर्भातील अनेक प्रकारचे कागदपत्र स्वतः समक्ष येवून सादर करावेत असे तलाठी यांनी सांगितल्यामुळे श्रावणबाळ, दिव्यांग योजना, संजय गांधी, विधवा परितक्ता व इतर योजनेतील पेंशन धारकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे सांगितले. उपाषीपोटी हे सर्व सकाळी 11 वाजल्यापासून ज्येष्ठ नागरीक हातात आधारासाठी काठ्या घेवून रांगेत उभे होते. त्यावेळी जितेश सरडे, राहुल झावरे, संभाजी नरसाळे, अमित जाधव, अनिल शिंदे, अमोल पवार, हनुमंत भोसले, चंद्रभान ठुबे, बाळासाहेब लंके हे कामानिमित्त तहसिल कार्यालयात गेले असता त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरीकांची लांब रांग दिसली. सदर ज्येष्ठ नागरीकांना विचारणा केली असता त्यातील काही ज्येष्ठ नागरीक तालुक्यातील डोंगरवाडी, पोखरी, ढवळपुरी, वनकुटे, वडगाव आमली गावांसह तालुक्यातील इतर गावांतून आलेले होते.

आम्हाला तलाठ्यांनी पारनेर तहसिल कार्यालयात पाठवविले आहे. त्यावेळेस आम्ही नायब तहसिलदार, संजय गांधी निराधार योजना यांच्याकडे गेलो असता त्यांनी सांगितले की, तलाठ्यांना आम्ही एप्रिलमध्ये हमीपत्रासह अध्यादेश काढला होता परंतु ते जमा करून घेत नसल्यामुळे ही गर्दी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.वयोवृद्धांना त्रास नको म्हणून आम्ही ते जमा करून घेत आहे असे सांगितले. त्यावेळी आम्ही हमीपत्रा बाबात शासनाचा काही अध्यादेश आहे का याबाबत विचारणा केली असता नायब तहसिलदार श्रीम.प्रियंका पाचर्णे यांना विचारणा केली असता त्यांनी नाही असे उत्तर दिले. जर हमीपत्र भरून घेण्याचा राज्य शासनाचा अध्यादेश नाही तर तुम्ही हमीपत्र का भरून घेत आहात? असा प्रश्न विचारला असता त्यांना उत्तर देता आले नाही. त्यानंतर आम्ही सर्व वयोवृद्धांना तहसिल कार्यालयातील पडवीत सर्व वयोवृद्धाना घेऊन बसलो. हमीपत्राचा कोणताही अध्यादेश नसताना नायब तहसिलदार यांच्या आडमुठे धोरणामुळे हजारो वयोवृद्धांची अडचण होवून योजनेपासून वंचित होण्याची शक्यता आहे.
याबाबत तहसीलदार यांच्याकडे केलेल्या प्रमुख मागण्या-
- 31/01/2022 रोजी संजय गांधी योजनेच्या समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या प्रकरणांचे अनुदान नायब तहसलिदार यांनी जाणून बुजून अडविले असल्याने त्याची फेरचौकशी करण्यात येवून
- वंचितांना न्याय देण्यात यावा.
- हमीपत्राचा सरकारी लेखी आदेश मिळावा.
- 31/01/2022 ते आजपर्यंत मंजूर व नामंजुर झालेल्या प्रकरणांचा लेखी अहवाल मिळावा.
- नवीन प्रकरणांना हमीपत्र मागू नये.
- संजय गांधी निराधार योजनेबाबत राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार कोणत्याही कागदपत्राबाबत संबंधित गावातील तलाठ्यांनी सदर कागदपत्रे जमा करून घ्यावेत असा लेखी आदेश द्यावा.
- ‘तुमची पारनेरकरांची बोगस प्रकरणी काढल्यामुळे शेकडो लोकांना घेवून येवून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न तुम्ही लोक करत आहात’ असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य आमच्या समस्त पारनेरकरांचा अपमान असून या वक्तव्याबाबत नायब तहसिलदार श्रीम. प्रियंका पाचर्णे यांनी लेखी माफी मागावी किंवा त्यांना निलंबीत करण्यात यावे
- प्रत्येक महिन्याला संजय गांधी निराधार योजनेची बैठक घेण्यात यावी..
- वरील मागण्या मान्य न झाल्यास 24 जुलै 2023 रोजी पारनेर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी यांच्यासह तहसिल कार्यालय, पारनेर येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा राहुल झावरे,जितेश सरडे,संभाजीराजे नरसाळे,अमोल पवार,अमित जाधव,बाळासाहेब लंके यांनी दिला