कार झाडाला धडकून बाळूमामांच्या दर्शनाला निघालेल्या ४ जणांचा जागीच मृत्यू

सातारा:सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील धोंडेवाडी येथील पेट्रोल पंपाजवळील सूर्याचीवाडी हद्दीत पहाटे साडेपाचच्या सुमारास मारुती ओमिनी कार झाडावर आदळून अपघात झाला. या अपघातात चार जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. कुरोली व बनपुरी येथील भाविक बाळूमामाच्या मेंढराचं देवस्थान असलेल्या लाकरेवाडी येथे देवदर्शनासाठी जात होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सिद्धेश्वर कुरोली येथील पांडुरंग देशमुख यांच्या मारुती ओमिनी कारमधून कुरोली व बनपुरी येथील भाविक बाळूमामाच्या मेंढराचं देवस्थान असलेल्या लाकरेवाडी येथे देवदर्शनासाठी जात होते. दरम्यान पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास खटाव तालुक्यातील धोंडेवाडीजवळील सुर्याजीवाडी हद्दीत कार रस्त्याकडेच्या झाडावर जोरात आदळून अपघात झाला. या अपघातात चार जण जागीच ठार झाले, तर चौघेजण गंभीर जखमी आहेत.
अपघाताची माहिती समजताच वडूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात तातडीने हलविले. अपघातात ठार झालेल्या व जखमी झालेल्या व्यक्तीची नावे अद्याप स्पष्ट झाली नाहीत. मात्र, हे सर्वजण बनपुरी व कुरोली येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा अपघात पहाटेच्या वेळेस चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अपघाताचा तपास वडूज पोलीस करत आहेत.

अपघातात एक पुरुष व तीन महिला जागीच ठार झाल्या आहेत. जखमींना वडूज आणि सातारा येथील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.