कळस(प्रतिनिधी):दरवर्षी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन त्या रक्कमेचा गावच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसाठी खर्च करण्याचा पायंडा घाटकोपर येथील रहिवासी असलेल्या शिरीष गाडगे यांनी जपला आहे.यंदाही शिरिष गाडगे यांनी त्यांची कन्या आहना हिच्या सहाव्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवस्ती या शाळेला 30000/- रुपये किमतीचे सिरॅमिकचे तीन मॅग्नेटिक बोर्ड सप्रेम भेट म्हणून दिले.
वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत दरवर्षी शिरीष हे सामाजिक उपक्रमांमधून आपल्या लाडक्या लेकीचा वाढदिवस साजरा करतात.यावर्षी त्यांनी विविध शाळांना दहा बोर्ड सप्रेम भेट म्हणून दिलेले आहेत त्यापैकी तीन बोर्ड त्यांनी धनगरवस्ती शाळेला पाठवले आहेत.आपलं काम करत असताना समाजाचा घटक म्हणून समाजाचं आपण काही देणं लागतो या भावनेतून शिरीष गाडगे हे सामाजिक कार्यामध्ये सतत सहभागी होत असतात.

कुठे धनगरवस्ती अन् कुठे घाटकोपर कुठलीही ओळख किंवा काहीही संबंध नसताना केवळ माणुसकीच्या ओलाव्यातून त्यांनी स्वतः ट्रान्सपोर्टने बोर्ड शाळेत पोहोच केले आहेत.खरं सांगायचं तर शिरीष गाडगे यांचे आभार मानायला शब्दच नाहीत. एखाद्या हायटेक कॉलेजमध्ये असतात तसे बोर्ड धनगरवस्ती या दुर्गम भागातील शाळेची शोभा वाढवत आहेत.
या बोर्डच्या माध्यमातून नक्कीच विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये ज्ञानाचे रंग भरले जाणार आहेत. शिरीष यांनी धनगरवस्ती शाळेसाठी दिलेली मदत मुलांच्या आयुष्यामध्ये शैक्षणिक प्रकाश पेरणारी असल्याचे बोलले जाते.