पारनेर(श्रीकांत चौरे):गेल्या सात वर्षांपासून दरवर्षी नवरात्रोत्सवात मतदार संघातील महिलांसाठी आ. नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून काढण्यात येणाऱ्या मोहटादेवी यात्रेच्या प्रस्थानासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार हे उपस्थित राहणार आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे देखील यावेळी हजेरी लावणार असल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली. आ. नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून सोमवार दि.१६ ऑक्टोबर रोजी या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. दि.१६ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या सुपा गटातील सुपा व वाडेगव्हाण गण तसेच पारनेर शहरातील सर्व प्रभागातील महिला शुभारंभाच्या यात्रेत सहभागी होणार आहेत. दि.१७ ऑक्टोबर रोजी निघोज गटातील निघोज व अळकुटी गणातील महिला, दि.१८ ऑक्टोबर रोजी कान्हूरपठार गटातील कान्हूर व जवळा गण, दि.१९ ऑक्टोबर रोजी टाकळी ढोकेश्वर गटातील टाकळी ढोकेश्वर व कर्जुलेहर्या गण, दि. २० रोजी ढवळपुरी गटातील ढवळपुरी व भाळवणी गण, दि. २१ रोजी नगर तालुक्यातील सारोळा कासार, चास, कामरगांव परिसरातील गावे, दि.२२ रोजी नगर तालुक्यातील देहरे, नांदगांव, कर्जुने खारे, जखणगांव या गावांतील महिलांसाठी मोहटादेवी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
▪️दररोज २२५ बसेस महिला भाविकांच्या यात्रेसाठी दररोज २२५ बसेसची सोय करण्यात आली असून २० बसेस राखीव ठेवण्यात येणार आहेत. २०० बसेसमधून काही बसेसचा खोळंबा झाल्यास त्या ठिकाणी राखीव बसेस पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
फराळ, चहा आणि पिण्याचे पाणी यात्रेदरम्यान महिलांसाठी फराळ, चहा तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक बससोबत प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून उपलब्ध असणार असून महिला भाविकांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.
▪️ अजितदादा काय बोलणार ?
मागील वर्षी सुप्रियाताई सुळे, रूपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत मोहटादेवी यात्रेचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यावेळी सुळे यांनी आ. लंके यांच्या आग्रहाखातर मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी सायकल देण्याचा शब्द दिला होता. तो आ. लंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी पुर्ण केला. आ. नीलेश लंके हे आमदार झाल्यानंतर सुरूवातीस पिंपळनेर येथे व येत्या सोमवारी हंगा येथे अजित पवार हे येत आहेत. यावेळी ते काय बोलणार ? आ. लंके यांना काय गिफ्ट देणार याची उत्सुकता आहे.