बेल्हे,दि.(प्रतिनिधी)अनेक इच्छुकांचे मनसुबे धुळीत मिळत बेल्हे ग्रामपंचायत उपसरपंचपदी अखेर राजेंद्र बबन पिंगट यांची बिनविरोध निवड झाली.ग्रामस्थांनी एकमेकांना पेंढा भरवत फटाक्यांची आतषबाजी करीत निवडीचे स्वागत केले.
या निवडणुकीत उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र बबन पिंगट व ग्रामपंचायत सदस्य नाजीम नसीर बेपारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.त्यातील सदस्य नाजीम नसीर बेपारी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.सभागृहात उपस्थित सतरा सदस्य व सरपंच असे अठरा सदस्यांनी राजेंद्र बबन पिंगट यांच्या निवडीला टाळ्या वाजवत सहमती दर्शवली.
ग्रामपंचायत निवडणूक प्रचारादरम्यान नाजीम गुलाब बेपारी,नवनाथ बाबुराव शिरतर,समीर गायकवाड,ग्राम पंचायत सदस्य कैलास आरोटे यांच्यासह काही महिला सदस्यांना उपसरपंच पद देण्यात येणार असल्याचे राजकीय पुढाऱ्यांनी शब्द दिले होते.त्यामुळे मुस्लिम, रामोशी,धनगर समाजातील मतदारांनी एकगठ्ठा मतदान करून मोठ्या मताधिक्याने उमेदवार विजयी केले.
आपल्या समाजाचा उपसरपंच होणार माझी कारभारीन उपसरपंच होणार यासाठी सर्वच सदस्यांनी फिल्डिंग लावली होती.उपसरपंचपद मिळवण्यासाठी काही इच्छुकांनी साम दाम दंड नीती भेद या नीतीचा वापर केला,पण त्याचा उपयोग झाला नाही.उपसरपंच पदासाठी असलेल्या सर्व इच्छुकांची मतमतांतरे जाणून घेतल्यानंतर पॅनेलच्या निवडणूक कोर कमेटीने उपसरपंच पदासाठी राजेंद्र बबन पिंगट यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलकडून राजेंद्र बबन पिंगट तर शिवसेना पुरस्कृत पॅनेलकडून नाजीम नसीर बेपारी यांचा उमेदवार अर्ज दाखल करण्यात आला होता.दुपारी एकनंतर नाजीम नसीर बेपारी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.उपसरपंच पदासाठी राजेंद्र बबन पिंगट यांचा एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्याने ते बिनविरोध उपसरपंच झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मुरलीधर कोरडे यांनी घोषित केले.
बेल्हे ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचासह सोळा सदस्यांनी टाळ्या वाजवत राजेंद्र पिंगट यांच्या निवडीला सहमती दर्शवली.उपस्थित ग्रामस्थांनी एकमेकांना पेढा भरवत फटक्यांची आतषबाजी करत स्वागत केले.
बेल्हे गावातील सर्व ग्रामस्थांसह सदस्यांना विश्वासात घेत गावचा विकास करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच राजेंद्र पिंगट यांनी सांगितले.
फोटोचा मजकूर–बेल्हे उपसरपंचपदी राजेंद्र बबन पिंगट यांची निवड झाल्यानंतर सर्व ग्रामपंचायत सदस्य
छाया–सुरेशभुजबळ.