बेल्हे(प्रतिनिधी)बेल्हे आळकुटी रस्त्यावर असणारी एक धोकादायक इमारत आज(रविवारी)सायंकाळी कोसळली.सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.मात्र,अद्यापही या इमारतीचा पडलेला भाग येथे कायम असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यातच या घटनेमुळे पुन्हा एकदा बेल्हे गावातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बेल्हे गावात मध्यवस्तीत अजूनही अनेक जुनेवाडे व इमारती आहेत.गावाच्या तुलनेत नविन गावठाण,चांदणी चौक,पोळेश्वर चौक,पेठआळी,रोहिदास मंदीर चौक अशा विकसित भागांत फारशा जुन्या इमारती राहिल्या नाहीत. गावातील जुन्या इमारतींपैकी बहुतांश ठिकाणी घरमालक व भाडेकरू यांच्यात वाद सुरू आहेत. मात्र, या वादामुळे मोडकळीस आलेल्या इमारतींची साधी दुरुस्तीही झालेली नाही. या इमारती धोकादायक स्थितीत उभ्या आहेत.

बेल्हे गावात धोकादायक इमारत कोसळली(छाया-सुरेशभुजबळ)
गावातील धोकादायक इमारतींवर तसे फलकसुद्धा लावण्यात आलेले दिसत नाहीत.बेल्हे जेजुरी महामार्गाच्या गटारीचे काम सुरू असताना आळकुटी रस्त्यावरील एका जुन्या इमारतीचा रविवारी सायंकाळी पाया खचला आणि जुन्या असणाऱ्या धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला आहे.सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.गावातील बहुतांश धोकादायक इमारती रहदारीच्या भागात आहेत.त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून वेळीच उपाययोजना करण्याची मागणी होऊ लागली आहे.
जीव मुठीत धरूनच वास्तव्य
बेल्हे गावातील धोकादायक इमारतींच्या संख्येत दरवर्षी भर पडत आहे.बेल्हे ग्रामपंचायतने धोकादायक इमारतींना दरवर्षी नोटीस देऊन त्या रिकाम्या करण्यास सांगणे गरजेचे आहे.परंतु अद्याप धोकादायक परिस्थिती असलेल्या इमारती रिकामी न केलेल्यांची संख्या अधिक आहे.गावातील मध्यवर्ती भागात असणारे घर सोडल्यास आजूबाजूला घर मिळेल का, असा प्रश्नही अनेकांसमोर उभा राहत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरूनच वास्तव्य करीत आहेत.