मंगरूळ शिवारातील रांजनखळग्यांची पर्यटकांना भुरळ

सुरेश भुजबळ

जुन्नर तालुक्यातील मंगरूळ गावच्या शिवारात कुकडी नदीच्या पात्रात रांजण खळगे  हे वैशिष्टयपूर्ण कुंड आहेत.आणखी एक विस्मयकारी बाब म्हणजे सध्या भीषण दुष्काळ परिस्थितीत निसर्गाचा आविष्कार पर्यटकांना आकर्षित करत आहे.या कुंडातील पाणी दुष्काळात सुद्धा अटत नाही.

रांजण खळगे…कदाचित अनेकाना हा शब्द नवीन असेल… मात्र,मंगरूळ परिसरात भेट दिल्यानंतर तुम्हाला निसर्गाचा एक वेगळा अविष्कार लक्षात येईल.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या मंगरूळ शिवारात कुकडी नदीपात्रात निसर्गाचा चमत्कार पहायला मिळतोय.‘रांजण खळगी’ म्हणजे नदीपात्रात असलेल्या खडकात  पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेले खड्डे…मंगरूळ-पारगाव रस्त्यावर कुकडी नदीच्या पुलाजवळ कुकडी नदीच्या पात्रात हा आविष्कार पहावयास मिळत आहे.

भौगोलिक बदलांचा अभ्यास करण्यासाठीही अभ्यासक इथं यावेत,असे येथील ग्रामस्थांना अपेक्षा आहे.सध्या हे खड्डे पर्यटकांनाही आकर्षित करत आहेत.मंगरूळ परिसरात कुकडी नदीच्या पात्रातील पाणी यावर्षी च्या दुष्काळ परिस्थितीमुळे आटले असले तरी, या नदीच्या पात्रात असलेल्या रांजण खळग्यातील पाणी आजही भरलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे हा भाग शहरी पर्यटकांना आकर्षित करत आहे,सध्या पर्यटकांची गर्दी वाढतेय. 

कुकडी नदी पात्रात खडकामध्ये रांजणखळग्यांचे विविध आकार पहायला मिळतात.या रांजण खळग्याना स्थानिक भाषेत‘कुंड’म्हणतात. निघोज च्या रांजण खळग्याची महती आता पाठ्यपुस्तकातही समावेश झाली आहे. कुकडी नदीला निसर्गानेच जणूकाही हे कुंड देऊन छान गिफ्ट दिलंय.त्यामुळं कुकडीचं सौदर्यंही वाढलंय,असे परिसरातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.