आळेफाटा(सुरेशभुजबळ)शेतमजूर महिलेवर बिबट्याच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच बिबट्याने घराच्या अंगणात खेळणाऱ्या आठ वर्षाच्या चिमुरड्याला सावज बनविले.ही घटना बुधवारी सकाळी आठ वाजता काळवाडी येथे घडली.
अकोले तालुक्यातील बेलापूर येथील आठ वर्षाचा रूद्र महेंद्र फापाळे हा मामाच्या गावाला काळवाडी(ता जुन्नर)येथील ग्रामदैवत कालिकामाता यात्रोत्सवाला मंगळवारी आला होता.रूद्र त्याचे मामा सचिन रोहिदास काकडे यांच्या घराच्या अंगणात काही मुलांसोबत खेळत असताना बिबट्याने त्याच्यावर झडप घातली.त्याला जबड्यात पकडून बिबट्या लगतच्या ऊसाच्या घेऊन गेला.
घटनेची माहिती मिळताच विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर,वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे घटनास्थळी दाखल झालेनंतर वनकर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने रुद्र चा देह पंचनामा करून ताब्यात घेतला.
दरम्यान सोमवारी(दि ६)सायंकाळी पिंपळवंडी येथील लेंडेस्थळ शिवारात शेतात काम करणा-या आश्विनी मनोज हुलवळे या शेतमजूर महिलेवर बिबट्याने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा काळवाडी येथे बिबट्याने बालकावर हल्ला करून ठार केल्यामुळे वनविभागाच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.
शासनाने नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठी आदेश देऊन तातडीने अमलबजावणी करावी तसेच बिबट्याला ठार मारण्याची परवानगी शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली.