आळेफाटा(प्रतिनिधी)अज्ञात चोरट्यांनी रविवारी दुपारी तांबेवाडी परिसरात तीन बंद सदनिका फोडून पाच लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला.
तांबेवाडी शिवारात अज्ञात चोरट्यांनी रविवारी दुपारी ज्ञानेश्वर गणपत तांबे यांच्यासह त्यांच्या भावजयीची बंद सदनिका फोडली.ज्ञानेश्वर तांबे घरात नसताना रविवारी दुपारी चोरट्यांनी कपाटातील चांदी,सोन्याचे दागिनेसह रोकड असा चार लाख २३हजार रुपयांचा ऐवज चोरटयांनी लंपास केला.त्यानंतर चोरट्यांनी जवळच असलेल्या उषा विलास तांबे यांच्या बंद सदनिका फोडून प्रवेश केला,या सदनिकात चोरट्यानी कपाटातील अर्धा ताऴे वजनाचे सोन्याचे कानातले डूल व २२ हजार रूपयांची रोकड लंपास केली.
दरम्यान तिसऱ्या सदनिकेचे मालक बाहेरगावी असल्याने या बंद सदनिकातील चोरट्यांनी किती ऐवज लंपास केला,आळेफाटा पोलिसांकडून याचा अधिकृत तपशील मिळू शकला नाही.सध्या लग्न सराई असल्यामुळे नागरिक घर बंद ठेवून कार्यक्रमाला जात असल्याने चोरट्यांनी बंद सदनिकावर लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून येत आहे.