राजुरी(प्रतिनिधी):जुन्नर तालुक्यातील राजुरी गावातील लोक सध्या कोल्ह्याच्या दहशतीने भयभीत झाले असून या कोल्ह्याने एका ग्रामस्थासह गायींवर हल्ला चढविला असल्याची घटना रविवारी घडली.
राजुरी(ता.जुन्नर)डोबी डुंबरेमळ्यात बबन डुंबरे हे शेतात काम करत असताना,कोल्ह्याने त्यांच्या पायाचा लचका तोडला.त्यानंतर कोल्ह्याचा मोर्चा शेतात चरत असलेल्या त्यांच्याच गायीकडे वळला.कोल्ह्याने गायीवर हल्ला चढवला,तीला चावा घेतल्यानंतर डुंबरे यांनी आरडाओरड करत परिसरातल्या शेतकऱ्यांना मदतीला बोलविले. त्यानंतर कोल्ह्याने पळ काढला.

परिसरातील ग्रामस्थांनी जखमी डुंबरे यांना राजुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले.त्यानंतर पुढील उपचारासाठी नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.वनकर्मचारी त्रिंबक जगताप यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
माणसाची चाहूल लागताच कोल्हा हा माणसाला घाबरून धूम ठोकणारा प्राणी पण राजुरी गावातील शेतकरी ग्रामस्थांनी काय बिघडवले कुणास ठाऊक?तो सरळसरळ माणसावर पाळीव जनावरांवर हल्ला करतोय, माणसाला घाबरणे सोडाच तो हल्ला करतोय,त्यामुळे त्याची दहशत निर्माण झाली आहे.
कोल्हा हा प्राणी माणसाच्या वाटेला जात नाही.तो पिसाळल्यावरच माणसांवर हल्ला करतो.बहुतेक हा कोल्ह पिसाळला असावा त्यामुळे वनखात्याने तातडीने त्याचा बंदोबस्त करावा,अशी प्रतिक्रिया प्राणिमित्रानी दिली