आरटीओकडून सह्याद्री व्हॅली महाविद्यालयाच्या स्कुलवर दंडात्मक कारवाई

आळेफाटा(प्रतिनिधी)बेल्ह्यात पिंपरी चिंचवड आरटीओ विभागाकडून मंगळवारी सह्याद्री व्हॅली विद्यालयाच्या स्कुलबसवर लायसन्स नसणे,परवाना,पियुसी,इन्शुरन्स, फिटनेस,अग्निशमन आदी कारणामुळे दंडात्मक कारवाई केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

आरटीओ’च्या दंडात्मक कारवाईमुळे राजुरी गावच्या हद्दीतील सह्याद्री व्हॅली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची असुरक्षितता चव्हाट्यावर आली आहे.परिवहन विभागाने परिसरात महाविद्यालयाच्या रस्त्यावर धावणाऱ्या सर्वच स्कुलबसच्या तपासण्याकरून दोषीवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

परिसरात आरटीओ आल्याची खबर लागताच अवैध स्कुलबस चालकांनी आपल्या गाड्या आरटीओ जाईपर्यंत इतरत्र लपवून ठेवल्या होत्या.दुपारी चारच्या सुमारास राजुरी गावच्या हद्दीत असलेल्या सह्याद्री व्हॅली महाविद्यालयाची विद्यार्थी भरलेली स्कुलबस रस्त्यावर धावत असताना बेल्हे बसस्थानकाजवळ पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयाचे परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक तान्हाजी धुमाळ,सहाय्यक मोटार निरीक्षक योगेश कांबळे यांनी बसची तपासणी केली असता वाहतूक करतांना मुलांना बसण्यासाठी व्यवस्थित शीट नसणे,दाटीवाटीने विद्यार्थ्याना बसवणे,परिवहन विभागाकडून वाहन प्रमाणित न करता त्यात मोडीफाय करून शीट बसवणे, चालकांकडे वाहन चालवण्याचा परवाना नसणे,वाहनाचा पाठीमागील भाग उघडा असणे,प्राथमिक उपचार पेटी नसणे,आगरोधक यंत्र नसणे,स्कुलबसमध्ये अटेंडंट असणे अशा अनेक बाबीच्या त्रुटी असतांना स्कुलबस रस्त्यावर बेफाम धावतांना आढळली.

मोटार वाहन निरीक्षक तान्हाजी धुमाळ,सहाय्यक मोटार निरीक्षक योगेश कांबळे यांनी या स्कुलबस मालकावर १९ हजार पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई केली.यावर आरटीओ यांनी अधूनमधून तपासणी मोहीम राबवून अवैध वाहतूकीवर लगाम घालण्याची गरज असल्याचे पालकांमधून मागणी होत आहे.एकंदरीत या कारवाईमुळे परिसरातील सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.

दंड न भरल्यास वाहन जप्त दंड आकारलेल्या स्कुलबस मालकांनी आठ दिवसात दंड न भरल्यास त्यांचे वाहन जप्त करण्याची पुढील कारवाई करण्यात येईल तसेच ज्या स्कुलबस मालकांनी अद्याप लायसन,गाडीचे फिटनेस, इन्शुरन्स, पियुसी आदी प्रमाणपत्र काढलेले नसतील त्यांनी ते काढून घ्यावे, असे आवाहन आरटीओ तान्हाजी धुमाळ यांनी केले.