चोंभूत परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

चोंभूत(प्रतिनिधी)चोंभूत(ता.पारनेर)शिवारात,गेल्या काही दिवसांपासून 

बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून त्याने पाळीव जनावरे फस्त करण्याचा सपाटा लावला आहे.त्यामुळे बिबट्याची नागरिकांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे.

चोंभूत अळकुटी रस्त्यावर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास,दबा धरलेल्या बिबटयाने दादाभाऊ माळी या शेतकऱ्याच्या घराच्या अंगणात बांधलेल्या पाळीव कुत्र्याचा फडशा पाडला.विशेष म्हणजे माळी या घराच्या काही अंतरावर असलेल्या आपल्या शेतात काम करत होते.बिबटयाने कुत्र्यावर हल्ला करत असताना त्यांनी आरडा-ओरडा करून परिसरातील शेतकऱ्यांना मदतीला हाक दिली,शेतकरी मदतीला धावलेनंतर बिबट्याने धूम ठोकली.

दरम्यान सलग तीन दिवस चोंभूत परिसरात बिबटया पाळीव प्राण्यांवर हल्ले करून पाळीव प्राणी ठार करत आहे. गेल्या तीन दिवसांत शेतकऱ्यांची चार वासरे, मेंढया बिबटयाने हल्ला करुन ठार केल्या आहेत. 

दरम्यान परिसरात धुमाकूळ घालून पाळीव प्राणी फस्त करणाऱ्या बिबट्याच्या बंदोवस्तासाठी वनविभागाने ठोस पावले उचलून नागरिकांना भयमुक्त करणे,आवश्यक आहे.