जुन्नर : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार स्व. निवृत्तीशेठ नामदेव शेरकर यांच्या जयंतीनिमित्त आज (शनिवार) सकाळी शिरोली बु येथील निवासस्थानी त्यांचा स्मृतिदिन आदरपूर्वक साजरा करण्यात आला.
या वेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन अशोक घोलप, नंदुकाका शेरकर, संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शेठबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.
स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांनी आपल्या दूरदृष्टी, सेवाभावी वृत्ती व संघर्षशील नेतृत्वातून श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. या कारखान्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले आणि गाव, तालुका व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली. सहकारभाव, शेतकरीहित व सामाजिक बांधिलकी यांचा आदर्श त्यांनी उभा केला.
प्रतिमापूजनानंतर झालेल्या कार्यक्रमात “शेठबाबांच्या विचारांचा आदर्श आमच्यासमोर सदैव राहील.आजवर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखालील तत्त्वांनुसार काम केले आहे आणि पुढेही त्याच मूल्यांचा वारसा पुढे नेत शेतकरी हितासाठी अजून प्रभावीपणे कार्य करू,” असा संकल्प सत्यशील शेरकर यांनी व्यक्त केला.