राजुरीत बिबट्या पिंजऱ्यात अडकला

आळेफाटा : जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे वनविभागाच्या पिंजऱ्यात रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार,राजुरी गावातील फुलगंगा मळ्यातील गोविंद शंकर हाडवळे यांच्या शेतावर बिबट्यांचा वाढता वावर पाहता स्थानिक ग्रामस्थांनी पिंजरा बसविण्याची मागणी केली होती. त्यानुसार वनविभागाने शेतालगत पिंजरा लावला होता. रविवारी रात्री भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या या पिंजऱ्यात अडकला.

घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी विष्णू उचाळे, ए. जी. सोनवणे तसेच रेस्क्यू पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पकडलेला बिबट्या सुरक्षितरीत्या माणिकडोह बिबट निवारण केंद्रात सोडण्यात आला. संबंधित बिबट्या अंदाजे चार ते पाच वर्षांचा असल्याचे वनविभागाने सांगितले.

दरम्यान, राजुरी परिसरात ऊसाच्या क्षेत्रामुळे बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भागात आणखी पिंजरे वाढवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.