“डीजे वाजला तर, आम्हीच पोलीस प्रशासनाचा डीजे वाजवू”वंचित बहुजन आघाडीचा इशारा

जुन्नर : खामगाव (ता. जुन्नर, जि. पुणे)येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. खामगावचा तरुण आदित्य सुरेश काळे याचा डीजे गाडीखाली चिरडून मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी काळे कुटुंबाची भेट घेऊन ठाम भूमिका मांडली.

तालुका अध्यक्ष गणेश जनार्दन वावळ, कामगार आघाडी अध्यक्ष सागर पवार व युवा आघाडी अध्यक्ष महेश पाठारे यांनी दिलेल्या आश्वासनात म्हटले की हायकोर्टाने डीजेवर बंदी आणूनही पोलीस प्रशासनाकडून गंभीर दुर्लक्ष केले जाते.याच निष्काळजीपणामुळे निरपराध तरुणाचा बळी गेला.

जुन्नर पोलीस ठाण्याचे अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करणे अत्यावश्यक आहे.या मागण्यांसाठी आघाडीने डीवायएसपी धनंजय पाटील यांना लेखी निवेदन दिले असून, तातडीने कारवाई न झाल्यास डीवायएसपी कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मिळवला जाईल,असा ठाम निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

पीडित काळे कुटुंबासह संपूर्ण खामगाव गावाने या मागण्यांना पाठिंबा दर्शवला असून आगामी आंदोलनात गावकऱ्यांचा सक्रीय सहभाग राहील,असे जाहीर करण्यात आले.

या वेळी गणेश जनार्दन वावळ, सागर पवार, महेश पाठारे, जावेद मोमीन, विशाल गणपत गडगे, अभिजीत माळवे, अरुण सोनवणे, गोरख मोरे, प्रदीप गौतम साळवे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.