बेल्हे(प्रतिनिधी) : कल्याण–अहमदनगर महामार्गालगत बेल्हे,आणे,पेमदरा परिसरात धाबे, परमिट रूम व गावोगावी बनावट दारूविक्रीचा बाजार जोरात सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. उत्पादन शुल्क विभागाने अलीकडेच धडक छापेमारी करत मोठ्या प्रमाणात बनावट दारूचा साठा जप्त केला. मात्र कारवाई न झाल्याची चर्चा स्थानिकांत सुरू असून, या सगळ्या प्रकारामुळे बेल्हे परिसर ‘बनावट दारूचे केंद्र’ म्हणून कुप्रसिद्ध होऊ लागले आहे.
गावागावातील तरुणाई, कामगार वर्ग याठिकाणी सहज दारू मिळते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही राजकीय गोटांचा छुपा आश्रय आणि प्रशासनातील शिथिलता यामुळे हा अवैध धंदा दिवसेंदिवस फोफावतोय, अशी नागरिकांची ओरड आहे.
स्थानिकांच्या मते, “गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात अवैध दारूची दुकाने उघडली आहेत. पोलिस व उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कारवाई करतात; पण काही दिवसांत पुन्हा धंदा सुरू होतो.”
या बनावट दारूमुळे केवळ आरोग्य धोक्यात येत नाही, तर गुन्हेगारी, भांडणे आणि अपघातांची मालिका वाढत असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
नागरिकांची मागणी आहे की, प्रशासनाने “एकदाच कठोर कारवाई करून या अड्ड्यांना कायमचे कुलूप लावावे”, अन्यथा बेल्हे व परिसरात कायदा-सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न उभे राहतील.