नाथपंथाचा जागर, दत्तभक्तीचा गजर अन् १४ दिवसांची भव्य पायी दिंडी; ११ नोव्हेंबरला मढीतून प्रस्थान
अहिल्यानगर : “श्री दत्तात्रेय महाराजांचा जयघोष…नाथपंथाचा जागर…आणि हजारो भाविकांच्या पावलांनी गाजणारी भक्तीची वाट…”असे चित्र आगामी नोव्हेंबरमध्ये पाहायला मिळणार आहे.श्री एकमुखी दत्त श्रीपाद वल्लभ संस्थान मढी यांच्या संकल्पनेतून मढी ते गाणगापूर या मार्गावर भव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महंत पोपटनाथ महाराज यांच्या प्रेरणा आशीर्वाद व मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या दिंडी सोहळ्याचे यंदा तिसरे वर्ष आहे.बडेबाबा मच्छिंद्रनाथ,श्री कानिफनाथ आणि श्री दत्तात्रेय यांच्या भक्तीपरंपरेचा जागर करत नाथपंथाचा प्रचार-प्रसार आणि हिंदुधर्म जनजागृती हा या सोहळ्यामागील प्रमुख उद्देश आहे.
बुधवार ११ नोव्हेंबर २०२६ रोजी मढी येथील श्री एकमुखी दत्त श्रीपाद वल्लभ संस्थानातून दिंडीचे प्रस्थान होणार आहे.त्यानंतर केळवंडी,चितळवाडी,रेणकेवाडी,जामखेड, धामणगाव,पोखरी,राजूर,पाथरूड,भूम,येरमळा,धाराशिव, तुळजापूर,इटकळ,अक्कलकोट,दुधनी,अंतूर आदी ठिकाणी मुक्काम करत दिंडी गाणगापूर येथे पोहोचणार आहे.
दिंडीतील भाविकांसाठी विविध ठिकाणी चहा-नाश्ता, भोजन व मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक दानशूर व्यक्ती,व्यापारी संघटना,सेवाभावी मंडळे, देवस्थान ट्रस्ट आणि भक्तगणांनी अन्नदान व इतर सेवेसाठी पुढाकार घेतला आहे.त्यामुळे हा प्रवास केवळ पायी दिंडी न राहता सेवा,श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा सोहळा ठरणार आहे.
“इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी” या उक्तीप्रमाणे २०२४ मध्ये सुरू झालेल्या या दिंडी सोहळ्याने आता तिसऱ्या वर्षात प्रवेश केला आहे.मढी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ,शिष्यगण व भाविकांच्या सहभागातून या धार्मिक उपक्रमाला मोठे स्वरूप प्राप्त होत आहे.
नाथसंप्रदायाच्या पवित्र भूमीतून सुरू होणाऱ्या या दिंडीत दत्तभक्ती,नाथसंप्रदायाचा जयघोष,भजन-कीर्तन आणि सामूहिक साधनेचा अनुभव भाविकांना घेता येणार आहे. पायी प्रवास करत गाणगापूरच्या पवित्र भूमीत पोहोचण्याचा हा सोहळा भाविकांसाठी श्रद्धेचा अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.या दिंडी सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धार्मिक कार्याला सहकार्य करावे,असे आवाहन श्री एकमुखी दत्त श्रीपाद वल्लभ संस्थान मढी,समस्त ग्रामस्थ,शिष्यगण व भक्तगणांच्या वतीने करण्यात आले आहे.
पाईवरी दिंडी सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांसाठी संपर्क :
पवार महाराज-७९७२१२२६७९,अभिषेक शिंदे- ८६००४९३४३४,शिवाजी जाधव-९०२२९६२८०६, रेवणनाथ मरकड-७५८८४१३९३९