आणे:-आणे परिसरात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची तीव्रता वाढत असतानाच आणे गावातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट उभे राहिले आहे.गावाला पाणीपुरवठा करणारी बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ९ सप्टेंबरपासून बंद असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.पाणीपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास २९ ऑक्टोबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे.
आणे गावातील गावठाण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणीसाठा यंदा कमी पावसामुळे आटत चालला आहे.गावाला पिण्याच्या पाण्यासाठी अन्य कोणताही सक्षम स्रोत उपलब्ध नसल्याने संपूर्ण गाव बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहे.मात्र,हीच योजना गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ बंद असल्याने नागरिकांसमोर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.
याशिवाय बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना क्रमांक २ अद्याप कार्यान्वित झालेली नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.याबाबत संबंधित ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांना वेळोवेळी माहिती देऊनही पाणीपुरवठा पूर्ववत झालेला नसल्याची तक्रार ग्रामपंचायतीने केली आहे.
चौकट:-दुष्काळाच्या छायेत पाण्यासाठी संघर्ष
पावसाअभावी आधीच गावातील पाणीस्रोतांवर ताण वाढला आहे.त्यातच नियमित पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक योजना बंद असल्याने महिला,ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.“पाणी द्या,अन्यथा रस्त्यावर उतरू,”अशी संतप्त भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.
या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे केली आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी,तहसीलदार,विद्यमान आमदार शरद सोनवणे, गटविकास अधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन पाठविण्यात आले आहे.
दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी,अन्यथा २९ ऑक्टोबरचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा आणेपठार ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहे.